जाहिरात

Tipu Sultan Connection With Mumbai: टिपू सुलतान आणि मुंबईचं नातं काय होतं ? मस्जिद स्टेशनशी आहे खास संबंध

Tipu Sultan Controversy: सध्या महाराष्ट्रात टिपू सुलतानवरून राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

Tipu Sultan Connection With Mumbai: टिपू सुलतान आणि मुंबईचं नातं काय होतं ? मस्जिद स्टेशनशी आहे खास संबंध
मुंबई:

जीतेंद्र दीक्षित, मुंबई

जर तुम्ही मुंबईत मध्य रेल्वे मार्गावरील लोकलने सीएसएमटीहून ठाण्याच्या दिशेला निघालात, तर पहिलं स्टेशन येतं 'मस्जिद'. या स्टेशनच्या नावाचा संबंध एकेकाळचा मैसूरचा शासक टिपू सुलतानशी आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल. विशेष म्हणजे, मस्जिद स्टेशनचं नाव या भागातील कोणत्याही मशिदीवरून पडलेलं नाही, तर एका ज्यू (Jewish) प्रार्थनास्थळामुळे पडलं आहे.

नक्की वाचा: फोटो पुन्हा लागणार, वादाचा भडका उडणार! उपमहापौर शान ए हिंद थेट बोलल्या...

टिपू सुलतानवरून पुन्हा वाद उफाळला

सध्या महाराष्ट्रात टिपू सुलतानवरून राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. सपकाळ यांच्या विधानाचा निषेध करत भाजपने राज्यभर आंदोलने केली, पुण्यात तर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने वातावरण भयानक चिघळलं होतं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरोप केलाय की भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली ज्यात काहीजण जखमी झाले. हाच आरोप भाजपकडूनही करण्यात आला आहे. टिपू सुलतान हा मुंबईत कधीच आला नव्हता , पण एका ज्यू प्रार्थनास्थळाच्या निमित्ताने त्यांचं या शहराशी नातं जोडलं गेलं आहे. मशिद स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या या प्रार्थनास्थळाला 'सिनेगॉग' (Synagogue) म्हणतात. टिपू सुलतान, हा सिनेगॉग आणि मस्जिद स्टेशनची कहाणी बहुतांश लोकांना अपरिचित आहे.  

ज्यू सैनिक बनला मुंबई आणि टिपू सुलतानमधील दुवा

मूळचं 'मस्जिद बंदर' हे मुंबईच्या सात बेटांपैकी एका बेटांचा भाग होतं. 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत समुद्र बुजवून ही बेटं एकमेकांना जोडली गेली. 1661 पर्यंत ही बेटं पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन हिचा विवाह इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्याशी झाला, तेव्हा ही बेटं हुंड्यात देण्यात आली होती. मस्जिद परिसरात सॅम्युअल स्ट्रीटवर एक जुनी ऐतिहासिक वास्तू आहे, जिला स्थानिक भाषेत 'जुनी मशिद' म्हटलं जातं. खरं तर मशिद म्हणजे मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ, पण ही वास्तू मशिद नसून हे ज्यू धर्मीयांचं केंद्र म्हणजेच 'सिनेगॉग' आहे. इतिहासकारांच्या मते, हे सिनेगॉग ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीतील 'सॅम्युअल' नावाच्या एका ज्यू सैनिकाने बांधलं होतं. म्हैसूरचा शासक टिपू सुलतानने या सॅम्युअलला युद्धात बंदी बनवलं होतं. मात्र, टिपू सुलतानच्या आईच्या विनंतीवरून त्याला माफी मिळाली आणि कैद्यांच्या अदलाबदलीत त्याचा ताबा पुन्हा इंग्रजांकडे देण्यात आला होता.

नक्की वाचा: हर्षवर्धन सपकाळांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचे बक्षिस, भाजपच्या नेत्याने केली घोषणा

'गेट ऑफ मर्सी सिनेगॉग'ची निर्मिती

टिपू सुलतानने सुटका केल्यानंतर कमांडर सॅम्युअल मुंबईत स्थायिक झाला. आपलं प्राण वाचल्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी त्याने या सिनेगॉगची निर्मिती केली. 1860मध्ये याचं पुनर्निर्माण सॅम्युअल स्ट्रीटवर करण्यात आलं. देवाने आपल्यावर दया दाखवली म्हणून सॅम्युअलने हे सिनेगॉग बांधले होते, त्यामुळे याचं नाव 'गेट ऑफ मर्सी सिनेगॉग' (Gate of Mercy Synagogue) म्हणजेच 'दयेचे द्वार' असं ठेवण्यात आलं. हे भारतातील सर्वात जुने सिनेगॉग आहे. या सॅम्युअल स्ट्रीटजवळचा भाग 'इस्रायल मोहल्ला' म्हणून ओळखला जातो.

टिपूच्या नातेवाईकाचा मुंबईत मृत्यू

'मस्जिद बंदर' या नावातील 'मस्जिद' हा शब्द या सिनेगॉगमुळे आला. हा भाग मुंबई बंदराचा महत्त्वाचा हिस्सा असल्याने हा भाग मस्जिद बंदर म्हणून ओळखला जाऊ लागला.  मुंबईच्या किनारपट्टी भागात कर्नाक बंदर, दाना बंदर यांसारखी अनेक बंदरं आहेत. भारतीय रेल्वेने इथल्या स्टेशनला 'मस्जिद' हे नाव दिलं, तेव्हापासून या भागाला या नावाची अधिकृत ओळख मिळाली.  टिपू सुलतानचं मुंबईशी अजून एक नातं आहे, 1799 मध्ये इंग्रजांविरूद्धच्या युद्धात टिपूचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे नातेवाईक देशाच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले. टिपूच्या कुटुंबातील नवाब अयाज अली हे आपल्या कुटुंबीयांसह माझगाव आणि भायखळा भागात राहायला आले होते. नवाब अयाज यांचा मृत्यू मुंबईतच झाला आणि त्यांची कबर माझगावमध्ये होती.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com