
ओंकार कुलकर्णी
मराठी शाळा टीकल्या पाहीजे. विद्यार्थ्यांनी पालकांनी मराठी शाळेतच त्यातल्या त्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये टाकले पाहीजे असा आग्रह धरला जातो. पण अनेक पालकांचा कल सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आहे. त्याला कारणं ही तशीच असतात. एकीकडे शिक्षक आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत असताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राज्यातली अशी एक जिल्हा परिषदेची शाळा आहे जिला टाळं लावलं गेलं आहे. हे टाळं दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर चक्क पालकांनीच लावलं आहे. त्या मागचं कारण ही तेवढचं धक्कादायक आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सोनारी या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. ही शाळा दहावी पर्यंत आहे. पण या शाळेत 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाही. बरं हे शिक्षक आताच नाहीत अशातला भाग नाही. गेल्या चार वर्षापासून या शाळेला शिक्षकांची प्रतिक्षा आहे. विज्ञान आणि गणित हे विषय शिकवणारे नियमित शिक्षक या शाळेला अजून ही मिळालेले नाहीत. नववी दहावी सारखे महत्वाचे वर्ष. त्यात विज्ञान आणि गणिताचे शिक्षक नसणे म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्या बरोबर खेळण्या सारखेच आहे.
त्यामुळे संतप्त पालकांनी या विरोधात भूमीका घेण्याचा निर्णय घेतला. आज उद्या आज उद्या असं शिक्षण खातं करत होतं. प्रत्यक्षात शिक्षक काही शाळेत येत नव्हते. त्यामुळे संतप्त पालकांनी मोठं पाऊल उचललं. त्यांनी गावातल्या जिल्हा परिषद शाळेला थेट टालं ठोकलं. त्यामुळे शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. त्यांनी धावाधाव करत शिक्षक शाळेत पाठवला. पण तिथे ही या विभागाची फजती झाली. नेमलेल्या शिक्षकाने नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास थेट नकरा दिला. त्याला ही काही कारण होते.
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आपण शिकवून शकत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर गावकरी आणखी आक्रमक झाले. पदविधर शिक्षक शाळेत शिकवण्यासाठी आलाच पाहिजे असा आग्रह त्यांनी या निमित्ताने धरला. नियमित शिक्षक या शाळेला मिळत नाही तोपर्यत शाळेचे टाळे काढणार नाही अशी भूमीका आता गावातल्या लोकांनी घेतली आहे. त्यामुळे शिक्षण विभागा समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांची काय चूक? त्यांना मात्र मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world