
सुनिल दवंगे, शिर्डी
आंतरराष्ट्रीय दर्जाचं देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिराला पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल साईबाबा संस्थानला प्राप्त झाला आहे. हा ईमेल अजित जक्कूमोल्ला या नावाने पाठवण्यात आला असून त्याचा आयपी अॅड्रेस कर्नाटकमधील असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. हा धमकीचा मेल 2 मे रोजी मिळाल्यानंतर साई संस्थानकडून तातडीने खबरदारीचे उपाय राबवण्यात आले असून संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अॅलर्ट करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये “फर्स्ट पहलगाम, नंतर शिर्डी असा मजकूर असून त्यामध्ये तामिळनाडूतील जफ्फार सादीक आणि जफ्फार सईद या दोन आरोपींची गुन्ह्यातून मुक्तता करण्याची मागणी करण्यात आली आहे. साई संस्थान प्रशासनाने या धमकी मेलची अधिकृत पुष्टी दिली असून शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 351(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी मेलचा सखोल तपास सुरु केला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस, एमएसएफ (महाराष्ट्र सुरक्षा बल), निवृत्त शस्त्रधारी सैनिक, तसेच साई संस्थानचे दोन हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी सतर्क झाले आहेत. मंदिर परिसरात भाविकांची तपासणी अधिक काटेकोर करण्यात येत असून बॅग स्कॅनरच्या सहाय्याने सर्व वस्तूंची तपासणी केली जात आहे.
(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय,आदिवासी विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)
साई मंदिराला सुरक्षेसाठी एक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि सर्व महाद्वारांवर शंभर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिवसभर चार आरती दरम्यान बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाव्दारे तपासणी केली जाते.
गेल्या काही वर्षांत साई संस्थानला अशा प्रकारचे धमकी पत्र किंवा मेल दोन वेळा प्राप्त झाले होते, मात्र प्रत्यक्षात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नव्हता. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून संस्थान आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असून भाविकांची सुरक्षितता यासाठी प्रथम प्राधान्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world