
विशाल पुजारी, प्रतिनिधी
Money Fraud : विदेशात फिरायला जाण्यासाठी चलन बदलून घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा. तीन पर्यटकांना भारतीय चलनाच्या बदल्यात दुबईचे चलन तर दिले पण त्याची रक्कम कमी असल्याचं समोर आलं आहे. ही घटना घडली आहे कोल्हापुरात. या तिघांना टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंटने चुना लावण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुबई सहलीसाठी लाखो रुपये घेऊन आलेल्या पर्यटकांना कमी विदेशी चलन देऊन चुना लावल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या तिघांनी दुबईला सहलीला जाण्याचा प्लान केला होता. कोल्हापूर बस स्थानक परिसरातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडे यासाठी पैसे दिले. तिघांची मिळून भारतीय चलनानुसार सात लाख रुपये 10 हजार इतकी रक्कम या ट्रॅव्हल्स एजंटकडे चलन बदलण्यासाठी दिली.
या एजंटने मात्र भारतीय चलनाच्या तुलनेने दुबईचं चलन कमी दिल्याने आपली फसवणूक झाल्याचं पीडितांच्या लक्षात आलं. शिल्लक रक्कम परत द्या अशी मागणी तीनही पर्यटकानी केली. मात्र संबंधित एजंटने हे पैसे दिले नाहीत. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी भाऊराव त्र्यंबक घोलप आणि चंद्रकला जयवंत नेरकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. घोलप याला पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या संशयित महिलेचा शोध पोलिस घेत आहेत.
नक्की वाचा - 13 व्या मजल्याच्या बाल्कनीबाहेर लटकताना दिसली दोन मुलं; Video पाहून हृदयाचा ठोका चुकेल
काय आहे नेमकं प्रकरण?
शाहूपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिपती पुंडलिक पाटील (वय 58, रा. साळुंखे पार्क, कळंबा), रवी श्रीनिवास नायडू (रा. उजळाईवाडी), शशिकांत मारुती पाटील (रा. सुर्वेनगर) हे तिघेही जलसंपदा विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी दुबई सहलीसाठी बसस्थानक परिसरातील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे एजन्सी चालवणारे घोलप यांच्याकडे 17 ते 23 जानेवारी 2024 अखेर टप्प्याटप्प्याने सात लाख 10 हजार रुपये भरले. दुबई सहल केलीही, मात्र महिपती यांच्याकडून पहिल्या टप्प्यात दोन लाख घेतले. प्रत्यक्षात त्यांना 1109 दिरम म्हणजे 25 हजार रुपये दिले. उर्वरित 1 लाख 75 हजार रुपये दिले नाहीत. नायडू यांच्याकडून 3 लाख 15 हजार रुपये घेऊन 1100 दिरम म्हणजे 25 हजार रुपयेच दिले. तसेच शशिकांत यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये घेऊन काहीच दिले नाही.
उर्वरित रक्कम मिळत नसल्याने तिघांची पोलिसात धाव
तीनही पर्यटकांनी घोलप आणि नेरकर यांच्याकडे उर्वरित रकमेची विचारणा केली त्यावेळेस त्यांनी प्रतिसाद दिला नाही. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे दोघेही हे एजंट पैसे देत नसल्याचं तीनही पर्यटकांना निदर्शनास येत होतं. तरी देखील घोलप, नेरकर यांच्याकडे पाठपुरावा करीत राहिले; पण त्यांनी पैसे दिले नाहीत. यामुळे महिपती यांनी मंगळवारी (12 ऑगस्ट रोजी) शाहूपुरी पोलिसांत या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार आरोपी घोलप याला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या संशयित महिलेचा शोध पोलिस घेत आहेत. पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी इतर पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world