Chhatrapati Sambhajinagar News : अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेलं युद्ध अद्याप थांबवण्याचं नाव घेत नाहीये. या यु्द्धात इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे इराणकडूनही अमेरिका-इस्त्रायला प्रत्युत्तर दिलं जात आहे. जगभरातील देशांना याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगरलाही या युद्धाचा फटका बसला आहे.
संभाजीनगरच्या MIDC मधील कारखाने बंद होण्याच्या मार्गावर...
छत्रपती संभाजीनगरची ओळख जागतिक स्तरावर एक प्रमुख 'ऑटोमोबाईल हब' म्हणून आहे. मात्र, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका या शहराच्या औद्योगिक वसाहतीला बसू लागला आहे. युद्धाच्या संकटामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला असून कंपन्यांमधील गॅसचा साठा आता संपत आला आहे. ही केवळ इंधन टंचाई नसून शहराच्या आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या उद्योगांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
आखाती देशातील युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरमधील MIDC मधील कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या MIDC तील अनेक कंपन्यांना LNG (Liquefied Natural Gas) ची आवश्यकता असते. मात्र सरकारकडून LNG बंद करण्यात आल्याने उद्योजकांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. परिणामी येथील चार कारखाने लवकरच बंद होतील असं सांगितलं जात आहे.
'बजाज ऑटो' , 'बजाज' बड्या कंपन्यांचं उत्पादन धोक्यात...
जगातील दोन देशांमधील संघर्षाचा परिणाम थेट स्थानिक पुरवठा साखळीवर झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅसचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. संभाजीनगरमधील वाळूज आणि शेंद्रा एमआयडीसीतील अनेक प्रक्रिया उद्योगांना गॅसची नितांत गरज असते. मात्र, गॅसचा साठा संपत आल्याने उत्पादन प्रक्रिया मंदावली असून, उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने संकट अधिक गडद झाले आहे. या गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका लघु आणि मध्यम उद्योगांना बसत आहे. बजाज ऑटोसारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांना लागणारे सुटे भाग आणि इतर साहित्य हे शहरातील शेकडो छोटे उद्योग पुरवत असतात. मात्र, गॅसअभावी हे छोटे युनिट्स आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जर हे छोटे पुरवठादार बंद झाले, तर त्याचा परिणाम मोठ्या कंपन्यांच्या उत्पादन साखळीवर होणार आहे.
संभाजीनगरच्या अर्थव्यवस्थेत 'बजाज ऑटो'चे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. बजाजला साहित्य पुरवणाऱ्या व्हेंडर्सचे जाळे गॅस संकटामुळे विस्कळीत झाले आहे. छोटे उद्योजक हतबल झाले असून त्यांच्या उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. पर्यायाने, बजाज सारख्या मोठ्या उद्योजकांचे उत्पादन लक्ष्य धोक्यात आले आहे. ही साखळी तुटल्यास हजारो कामगारांच्या रोजगारावर आणि शहराच्या औद्योगिक उलाढालीवर याचे गंभीर परिणाम होतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सरकारकडे मदतीची मागणी...
शेंद्रा, वाळूज, चिखलठाणा ऑटोमोबाइलसाठी LNG गॅस वापरला जातो. या कारखान्यांसाठी 250 ते 300 मेट्रिक टन गॅस लागतो. स्टील कंपनीला देखील मोठ्या प्रमाणात गॅस लागतो. येथील काही युनिट बंद होण्याच्या मार्गावर आहेत. एकदा हे युनिट बंद पडल्यास पुन्हा सुरू करणं अडचणीचं असतं. दरम्यान चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यश्र उत्सव मच्छार यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. NDTV मराठीशी बोलताना ते म्हणाले, सरकारने आम्हाला मदत करावी. मोठ्या उद्योगांना फटका बसल्यास छोटे उद्योजक पूर्ण बंद पडतील. परिणामी कृषी आणि इतर युनिट बंद पडू शकतात. कंपनी बंद पडल्यास त्याला सुरू करण्यास 24 ते 48 तास लागते. पण यात प्रोसेस सायकल बंद पडते. आजची परिस्थिती गंभीर आहे. उद्या तर आणखी गंभीर परिणाम जाणवले तर बजाज ऑटोला पुरवठा करणाऱ्या युनिटला फटका बसण्याची भीती आहे. सरकार मदत करेल याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही मुख्यमंत्री यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, मंत्री अतुल सावेंकडून प्रयत्न केले जात असल्याचंही मच्छार यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world