
पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणापासून हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवेत असलेले जालिंदर सुपेकर हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. हगवणे पिता पुत्रांना शस्त्र परवाना देण्यापासून ते 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर लावले जात आहेत. याच आरोपांनंतर जालिंदर सुपेकर यांची पदावरुन उचलबांगडीही करण्यात आली होती. अखेर या सर्व आरोपांवर आता जालिंदर सुपेकर यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1. पोलीस निरीक्षक आत्महत्या प्रकरण:
पोलीस निरीक्षक आत्महत्या प्रकरणात आमचचा दोष नसल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणीचा तपास सीआयडी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अशोक सादरे यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलेला कोणताही प्रकार हा घडलेला नसल्याबाबत त्यांनी न्यायालयाला अहवाल सादर केला होता. सदर अहवालातील गोष्टींची न्यायालयाने ही पडताळणी करून तो अहवाल बरोबर असल्याबाबत खात्री करून स्वीकारला आहे . त्याबाबत आमचा कोणताही दोष नसल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याचे जालिंदर सुपेकर यांनी स्पष्ट केले आहे.
2. कारागृह वस्तू खरेदीत 500 कोटींचा भ्रष्टाचार आरोप बाबत
तुरुंग विभागात खरेदीमध्ये 500 कोटी रुपयांचा जो भ्रष्टाचार झाला असा आरोप होत आहे, सदर खरेदी हीच मुळात 350 कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये 500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार होऊ शकत नाही. तसेच सदर खरेदी ही शासनाने नेमलेल्या राज्य खरेदी समितीमार्फत होत असते . सदर समितीचा मी फक्त एक सदस्य आहे. कमिटीचे इतर सदस्य हे तुरुंग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतात. हे सर्व निर्णय हे पूर्ण कमिटी घेत असते. मला एकट्याला त्यामध्ये स्वतंत्र अधिकार नाही. त्यामुळे त्याबाबत माझ्यावर लावलेले पूर्ण आरोप हे पूर्णतः खोटे आहेत. सदर कमिटीमार्फत सदरची खरेदी शासकीय नियमाप्रमाणे झालेली आहे, असा खुलासा सुपेकर यांनी केला आहे.
नक्की वाचा - Godavari River : तेलंगणाच्या सीमेवरील धरणात सहा मुलं बुडाली, नदीच्या किनाऱ्यावर कुटुंबीयांचा आक्रोश
3) हगवणे कुटुंबाच्या कृत्याचा निषेध...
मागील 2 वर्षापासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर आहे.
त्यामुळे माझा कार्यकारी पोलीस दलाशी कोणताही संबंध नाही. कार्यकारी पोलीस दलातील कोणताही घटक हा माझ्या अधिपत्याखाली नाही. त्यामुळे मी कोणाला सूचना देण्याचा संबंध येत नाही. हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही. हगवणे कुटुंबाने केलेल्या अमानवीय अपराधाशी माझा कुठलाही संबंध नाही. त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे. कृपया त्यांच्या कृत्याशी माझा संबंध जोडू नये ही माझी नम्र विनंती.
Rohad village : कुटुंबातील 'होम मिनिस्टर'ने ठरवलं अन् गावात दारूबंदी लागू; धुळ्यातील या गावाची राज्यभरात चर्चा
4) शस्त्र परवाना देण्याच्या अधिकाराबाबत
शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात. तत्पुर्वी सदर अर्जदाराच्या अर्जावर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलीस उपयुक्तांना देतात. त्यांनी पडताळणी केल्यावर सदरचा परवाना पोलीस आयुक्त यांच्याच अंतिम मान्यतेने दिला जातो. त्यानंतर त्याचे आदेश हे अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन हे काढत असतात. त्यामुळे सदरचा परवाना मीच दिला आहे हे म्हणणे चुकीचे आहे, असा दावाही सुपेकर यांनी केला आहे.
5) व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत
माझे कोणात्यातरी अज्ञात व्यक्तीबरोबर संभाषण असलेली ऑडिओ क्लिप काही माध्यमातून प्रसारित केली जात आहे. याबाबत माझे म्हणणे आहे की, संबंधित ऑडिओ क्लिपही आमची बदनामी करण्याच्या दृष्टीने हेतुपूर्वक प्रसारित केली जात आहे. त्यामुळे अशा छेडछाड केलेल्या ऑडिओ क्लिपद्वारे माझी बदनामी करणाऱ्या संबंधिताविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा जालिंदर सुपेकर यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world