कराड: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीमध्ये महाविकास आघाडीची धुळधाण झाली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचाही धुव्वा उडाला. महायुतीच्या या ऐतिहासिक विजयानंतर 84 वर्षाचा योद्धा म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवार यांचे राजकारण संपले, अशा टीका आता सत्ताधारी नेते करताना दिसत आहेत. या टिकेला आता स्वतः शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निकालाला 48 तास उलटल्यानंतरही शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, त्यामुळे शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज शरद पवार यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले.
नक्की वाचा: मनसेमुळे उद्धव ठाकरेंची 'मशाल' पेटली! 10 जागांवर उडाला असता धुरळा; वाचा 'राज'कारण
काय म्हणाले शरद पवार?
'काल निकाल लागला आज मी कराडमध्ये आहे. हा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल असे वाटले नव्हते. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना पुन्हा उभं करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, नव्या जोमाने कर्तृत्वान पिढी उभं करणं हा माझा कार्यक्रम राहील, 'असे म्हणत शरद पवार यांनी पुन्हा मैदानात उतरुण काम करणार असल्याचे सांगितले आहे. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुका निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याची मागणी केली आहे. तसेच लाडक्या बहिणींना आता पुढचा हप्ता मिळेल. कोणत्याही शेतकऱ्यांच्या घरी वीजबिल येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
'बारामतीमध्ये कोणाला तरी उमेदवारी देणे गरजेचे होते. तिथे जर उमेदवार दिला नसता तर चुकीचा संदेश गेला असता. दोघांची तुलना होणार नाही माहित होते. अजित पवारांचे अनेक वर्षांचे राजकारण, सत्तेतील सहभाग आणि दुसरीकडे नवखा उमेदवार होता,' असे म्हणत त्यांनी बारामतीमधील युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार लढाईवर प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, आम्हाला ज्या यशाची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही. लाडकी बहीण प्रामुख्याने महत्वाची ठरली. आमचे सरकार नसेल तर ही योजना बंद होईल, असा प्रचार सत्ताधाऱ्यांनी केला. त्याचा फटका बसला असावा, असाही दावा शरद पवार यांनी यावेळी केला. उद्या आमच्या विजयी तसेच पराभूत उमेदवारांची बैठक होणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.