निलेश बंगाले, वर्धा
वर्ध्यातील एका पठ्ठ्याने मला माझे 15 लाख रुपये पाठवावे, अशा आशयाचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील घोषणेचा आधार घेत या व्यक्तीने ही मागणी केली आहे. अस्लम सत्तार पठाण असं सामाजिक कार्यकर्ते असेलल्या या व्यक्तीचं नाव आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अस्लम सत्तार पठाण यांनी आपल्या पत्रात म्हटलं की, "तुम्हाला 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान बनवण्यात माझी देखील महत्वाची भूमिका होती. तुम्ही सर्व भारताचे पंतप्रधान असून मीही भारताचा नागरीक आहे. तुम्ही 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार असल्याची घोषणा केली होती."
( नक्की वाचा : पूजा खेडकरांच्या वडिलांनी 2 कोटींची लाच दिली ते मंत्री कोण? तक्रारदारांनी सांगितलं नाव )
"आतापर्यंत मला पैशांची गरज नव्हती, त्यामुळे मी मागितले नाही. माझे पैसे तुमच्याकडे सुरक्षित राहतील, अशी मला खात्री होती. पण आता 10 वर्षांनी मला पैशांची गरज लागली आहे. त्यामुळे मला ते 15 लाख रुपये द्यावे. कारण तुम्ही तशी घोषणा केली होती. व्याजासह पकडले तर ती रक्कम जवळपास 20 लाखांपर्यंत जाते. मात्र मला व्याज नको केवळ मुद्दल 15 लाख रुपये द्यावे,", अशी मागणी अस्लम सत्तार पठाण यांनी केली आहे.
(नक्की वाचा- उत्तर प्रदेशात भाजपाचा पराभव का झाला? पक्षाच्या रिपोर्टमध्ये सांगितली 6 मोठी कारणं)
"मी मोदी साहेबांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे मोदी साहेबांनी माझे 15 लाख रुपये माझ्या खात्यात जमा करावे, जेणेकरुन माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित होईल. आता मी साध्या झोपडीत राहत आहे. रोज मजुरी करुन माझ्या कुटुंबाचं पालन-पोषण करत आहे. त्यामुळे मला माझे 15 लाख रुपये लवकर मिळावे", असं देखील अस्लम सत्तार पठाण यांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world