- सिन्नरच्या मुसळगावचे ८१ वर्षीय किसन गेल्या ४१ वर्षांपासून अखंड पंढरपूरची आषाढी वारी करतात
- सुरुवातीला किसन पायी वारी करत होते, नंतर चालण्यात अडचण आल्यामुळे सायकलने वारीत सहभागी होत आहेत
- किसन म्हणतात की शरीरात ताकद आहे तोपर्यंत ते वारी करतील
प्रसाद शिंदे
विठ्ठलाच्या भक्तांना आता पंढरपूरची ओढ लागली आहे. अनेक वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. काही जण पायी वारी करतात. संतांच्या पालख्या ही पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रम करत आहेत. त्या दिंड्यांमध्ये अनेक वारकरी सहभागी झाले आहेत. त्या पैकीच एक आहेत किसन. ते सिन्नरच्या मुसळगावचे आहेत. ते ही संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोबत पंढरपूरच्या दिशेन निघाले आहेत. थक्क करणारी बाब म्हणजे किसन यांचे वय 81 वर्ष आहे. गेली 41 वर्ष ते न विसरता पंढरपूरची आषाढी वारी करतात. त्यांनी आपल्या वारी मागची कहाणी सांगितली आहे. शिवाय जोपर्यंत शरीरात ताकद आहे तो पर्यंत वारी करणार असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हरी नामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे आगमन झाले आहे. या वारीत सिन्नरच्या मुसळगावचे 81 वर्षीय वृद्ध वारकरी किसन हे सर्वांच्या कुतुहलाचे विषय ठरले आहेत. या 81 वर्षीय वारकऱ्याने सलग 41 वर्षे वारीचे अखंड व्रत जपले आहे. सुरुवातीची 33 ते 34 वर्षे त्यांनी पायी वारी केली. त्यानंतर वृद्धत्वामुळे त्यांना चालणे अशक्य झाले. पण त्यांनी वारी सोडली नाही. त्यांनी पर्याय शोधून काढला. त्यामुळे गेले 8 ते 9 वर्षांपासून ते सायकलवरून वारीत सहभागी होत आहेत. वारी म्हणजे आपला प्राण असल्याचं ते सांगतात.
ते म्हणतात मला 41 वर्षापासून देवाने सांभाळलं आहे. अजून ही देव आपल्याला सांभाळत आहे. तो आपलं वाईट करणार नाही. आपण ही कोणाचे वाईट केलं नाही. देव आपलं कल्याण करणार. आपण वाईट केलं तर तो ही आपल्याला खड्ड्यात लोटणार. देव आपल्याला सावरतो हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहीजे. दे आपल्या पाठी मागे आहे असं ही त्यांनी यावेळी एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना सांगितलं. आता चालणं शक्य नाही तर सायकल घेवून गेल्या आठ वर्षापासून पंढरपूर गाठतोय असं त्यांनी सांगितलं. सर्वांना सुख दे. शेवटपर्यंत सर्वांना सुखात ठेव. बाकी आपल्याला काही नको. धन दौलत बरोबर घेवून जाणार नाही. त्यामुळे त्याचा मोह नाही असं ही ते विठ्ठलाला सांगतात. आपल्यासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी ते यावारीत पांडूरंगाकडे मागतात.
त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हे पायी दिंडीचे अंतर जवळपास 450 किलोमीटर आहे. पायी प्रवासासाठी साधारण 27 ते 29 दिवसांचा कालावधी लागतो. वारकरी दररोज सरासरी 20 किलोमीटर पायी चालून हा प्रवास पूर्ण करतात. वारकरी असलेले किसन ही या दिंडी बरोबर हळू हळू पुढे सरकत असतात. गेल्या पंधरा दिवसापासून ते वारीत सहभागी झाले आहेत. आणखी पंधरा एक दिवसात ते पंढरपूरात पोहोचतील. विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर जिवन सार्थक झाल्या सारखे वाटते असं त्यांनी यावेळी सांगितलं. ज्या वयात लोक निवृत्तीचं जिवन जगत असतात. काही जण एकाच जागेवर बसतात. काही जण अनेक व्याधींनी ग्रस्त असतात त्याच वयात किसन हे सायकलच्या माध्यमातून वारी करत आहे. हे खरोखरच थक्क करणारेच म्हणावे लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world