अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपरिषदेच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड पाहायला मिळाली. कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जतच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. या नव्या राजकीय समीकरणामुळे भाजपच्या छायाताई शेलार यांची कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी भाजपला थेट पाठिंबा दिल्याने कर्जत नगरपरिषदेत आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची नवी युती सत्तेवर आली आहे.
असे जुळले कर्जत नगरपरिषदेचे नवे राजकीय समीकरण
कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपच्या 9 नगरसेवकांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 4 नगरसेवकांनी छायाताई शेलार यांच्या उमेदवारीला अधिकृत पाठिंबा दिला. दोन्ही पक्षांचे संख्याबळ एकत्र आल्यामुळे विरोधकांनी माघार घेतली आणि शेलार यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
(नक्की वाचा- Nashik News: बेल्ट, पाईपने मारहाण, अंगावर चटके; आईकडून लिव्ह इन पार्टनरच्या मदतीने मुलांचा छळ)
पवार-शिंदे एकत्र येण्याचे कारण काय?
कर्जत शहरात गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत राजकीय वाद आणि प्रशासकीय अडचणींमुळे अनेक महत्त्वाची विकासकामे रखडली होती. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात मोठी नाराजी पसरली होती. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन शहराच्या रखडलेल्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राम शिंदे आणि रोहित पवार यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: एक सल्ला जीवावर बेतला! अल्पवयीन मुलाकडून 50 वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या)
छायाताई शेलार यांची प्रतिक्रिया
"कर्जत नगरपरिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एकत्र सत्तेत आले आहेत. रखडलेली सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी आणि कर्जत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ही आमच्यासाठी मोठी संधी आहे", अशी प्रतिक्रिया छायाताई शेलार यांनी दिली.
नेहमीच एकमेकांवर राजकीय चिखलफेक करणाऱ्या राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात कर्जतच्या स्थानिक पातळीवर जुळलेली ही नवी युती संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. 'विकास' हा केंद्रबिंदू ठेवून तयार झालेले हे नवे समीकरण किती टिकणार आणि कर्जतचा किती विकास होतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world