लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवार लगचेच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अनेक जण त्यांच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. काहींनी तर पवारांच्या भेटीगाठीही घेतल्या आहेत. मविआमध्ये अजूनही विधानसभेचे जागा वाटप झालेले नाही. पण येत्या काही दिवसात ते होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीला अजूनही तीन महिने आहेत. या कालावधीत आम्ही ते पुर्ण करू असेही ते म्हणाले. काही झाले तरी विधानसभा निवडणूक जिंकणे हे आमचे लक्ष्य आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी त्यांनी महाभारतातल्या अर्जुनाचे उदाहरण दिले. अर्जुनाला जसा फक्त माशाचा डोळा दिसत होता. त्याने त्याच्या लक्ष्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यानंतर त्यांने त्या माशाचा डोळा भेदला होता. त्या प्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीवर आम्ही लक्ष केंद्रीत केल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र राहणार आहोत असेही त्यांनी सांगितले. लोकसभेत आम्हाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. यावेळी काही छोटे पक्ष आमच्या बरोबर होते. पण त्यांना लोकसभेत जागा देता आल्या नाहीत. मात्र यावेळी त्यांची काळजी घ्यावी लागेल असेही ते म्हणाले. अजून जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. मात्र आता लवकरच जागा वाटपावर चर्चा होईल, असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांचे टेन्शन वाढले, शरद पवार आता गडातच मोठा धक्का देणार
विधानसभा निवडणुकीला तीन महिने शिल्लक आहेत. या कालावधीत जागावाटप पुर्ण करण्यावर भर देण्यात येईल. शिवाय लवकर उमेदवार जाहीर करण्यावरही लक्ष असेल. राज्यात परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. मविआमध्ये सामुहीक चेहऱ्याने आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण या चर्चांवर त्यांनी पुर्ण विराम दिला आहे.
ट्रेंडिंग बातमी - कोणत्या महिलांना मिळणार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ
लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. यात नितीश कुमारांचे खासदार नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत पवारांना विचारले असता या बाबत आपल्याला काही माहिती नाही. शिवाय तशी शक्यता असेल असेही वाटत नाही. सध्याच्या स्थितीत आता निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा निवडणुका नकोत. असं म्हणत त्यांनी केंद्रात सत्तांतर किंवा मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळून लावली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीने सर्वांना जमिनीवर आणले असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर बोलताना आम्ही जमिनीवरच आहोत असे शरद पवार म्हणाले.