Who is Dr. Jyoti Waghmare : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून ही निवडणूक बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार आधीच जाहीर केले होते, मात्र शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता होती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा केली आहे. अनेक बड्या आणि चर्चेत असलेल्या नावांना मागे टाकत एकनाथ शिंदे यांनी एका उच्चशिक्षित आणि तळागाळातील कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी देऊन सर्वांनाच धक्का दिला आहे.
कोण आहेत डॉ.ज्योती वाघमारे?
डॉ. ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील असून त्या एक धडाकेबाज महिला कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. मागील 15 वर्षांपासून त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. एप्रिल 2023 मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी आहे.
शिवसेनेतील ऐतिहासिक उठावानंतर एकनाथ शिंदे यांची बाजू विविध माध्यमांमधून आणि चर्चासत्रांमधून अत्यंत आक्रमकपणे मांडण्याचे काम त्यांनी केले आहे. विशेषतः दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
( नक्की वाचा : Sharad Pawar : शरद पवारांसाठी काँग्रेसने सोडला दावा; महाविकास आघाडीचा 'राज्यसभा' फॉर्म्युला ठरला )
संघर्षमयी कौटुंबिक पार्श्वभूमी
डॉ. ज्योती वाघमारे यांचा प्रवास अत्यंत संघर्षातून झाला आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणूनही काम केले होते. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सोलापूरच्या जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.
वडिलांचा हाच वारसा पुढे चालवत ज्योती वाघमारे यांनी मानवी हक्क अभियान आणि आंबेडकरी चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली. शिक्षणाच्या बाबतीतही त्या अत्यंत हुशार असून त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी पदवी मिळवली आहे. दहावीच्या परीक्षेत त्यांना 84% गुण मिळाले होते, तर बारावीत त्या पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आल्या होत्या. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड अशा 5 भाषांवर प्रभुत्व आहे.
( नक्की वाचा : Ahilyanagar: थरारक! भरवस्तीत दुचाकीस्वाराचा अंदाधुंद गोळीबार; कुख्यात गुंड सागर मोहळकर रक्ताच्या थारोळ्यात )
शिवसेनेचा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर डॉ. ज्योती वाघमारे यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली. विरोधकांच्या टीकेला त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर देणाऱ्या प्रवक्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात. सलग तीन दसरा मेळाव्यांमध्ये त्यांनी आपल्या घणाघाती भाषणातून आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्राचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानाचा त्यांचा सखोल अभ्यास ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. त्यांनी काही काळ वृत्त निवेदिका म्हणूनही काम केले असून वालचंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून 10 वर्षांहून अधिक काळ अनुभव घेतला आहे.
उमेदवारीमागील राजकीय गणित
एकनाथ शिंदे यांनी डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन एकाच वेळी अनेक समीकरणं साधली आहेत. एक उच्चशिक्षित दलित महिला उमेदवार देऊन त्यांनी सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश दिला आहे. तसेच सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी वाघमारे यांचा उपयोग होऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world