राहुल कुलकर्णी, NDTV मराठी
मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामुळे त्यांच्यावर मोठे राजकीय संकट ओढावले आहे आणि विरोधक त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मागत आहेत. अशा परिस्थितीत भगवानगडावर जाऊन त्यांनी वंजारी समाजाच्या पाठिंब्याचा संदेश दिला आहे का? हा दौरा अजित पवार आणि भाजपला दबावात आणण्याचा प्रयत्न आहे का? यावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धनंजय मुंडे भगवानगडावर का गेले?
संकटाच्या काळात समाजाचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला असावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मोठे आरोप होत आहेत. त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते म्हणून टार्गेट केले जात आहे. अशा वेळी भगवानगडावर जाऊन त्यांनी वंजारी समाज त्यांच्या पाठिशी आहे असा संदेश दिला आहे.
(नक्की वाचा- MNS Melava: राज ठाकरे भरसभेत खोट बोलले? राजू पाटलांना शून्य मते पडल्याचा दावा चुकीचा; सत्य वेगळच...)
अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा?
अजित पवार हे सध्या भाजपसोबत सत्ता उपभोगत असले तरी, धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद टिकवण्यावर त्यांनी ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. त्यामुळे भगवानगडावर जाऊन मुंडेंनी वंजारी समाजाचा मोठा आधार आपल्या मागे असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला आहे. जर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली, तर वंजारी समाज नाराज होऊ शकतो आणि त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
भाजपला सावध करण्याचा प्रयत्न?
भाजपला ओबीसी आणि वंजारी समाजाच्या मतांची गरज आहे. जर धनंजय मुंडेंना जबरदस्तीने राजीनामा द्यायला लावला, तर वंजारी समाज नाराज होईल, हे दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. त्यामुळेच भगवानगडावर जाऊन समाज त्यांच्या मागे असल्याचे चित्र त्यांनी उभे केले आहे.
महंत नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्याचा राजकीय फायदा
भगवानगड वंजारी समाजाचे श्रद्धास्थान आहे आणि महंत नामदेव शास्त्री यांचे समाजावर मोठे प्रभाव आहे. नामदेव शास्त्री यांनी खुल्यापणे धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याने, त्यांचा समाजावरील प्रभाव अजून वाढला आहे. त्यामुळे भाजप आणि अजित पवार जर धनंजय मुंडेंवर कारवाई करणार असतील, तर त्यांना वंजारी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
(नक्की वाचा- Political News : ठाकरे गटाला कोकणात खिंडार? उद्धव ठाकरेंचा शिलेदार भाजपात प्रवेश करणार?)
अजित पवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न?
अजित पवार सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत, आणि ते धनंजय मुंडेंच्या संकटात त्यांना कितपत मदत करतील, याबाबत साशंकता आहे. जर धनंजय मुंडेंना मंत्रीपद गमवावे लागले, तर पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना फायदा होऊ शकतो, हे धनंजय मुंडेंना माहित आहे. त्यामुळे भगवानगडावर जाऊन त्यांनी वंजारी समाजाला एकत्र केले, जेणेकरून अजित पवार आणि भाजपवर राजकीय दबाव वाढेल. धनंजय मुंडेंच्या या दौऱ्याचा स्पष्ट संदेश असा आहे की वंजारी समाज त्यांच्यासोबत आहे, आणि त्यांच्या विरोधात कारवाई केल्यास समाजाचा रोष भाजप आणि अजित पवारांना सहन करावा लागू शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world