जाहिरात

Pune News: मुलाचे डोळेच काय पूर्ण शरीर घ्या! पुण्यात 21 वर्षीय लेकासोबत घडली भयंकर घटना, वडिलांचा मोठा निर्णय

Pune News: आपल्या 21 वर्षीय मुलासोबत भयंकर घडल्यानंतर त्याच्या वडिलांनी अतिशय मोठा निर्णय घेतला. पुण्यात नेमकं काय घडल, वाचा सविस्तर बातमी...

Pune News: मुलाचे डोळेच काय पूर्ण शरीर घ्या! पुण्यात 21 वर्षीय लेकासोबत घडली भयंकर घटना, वडिलांचा मोठा निर्णय
"Pune News: तरुण लेकाच्या निधनानंतर बापाचा धाडसी निर्णय"
NDTV Marathi

- आकाश सावंत, प्रतिनिधी
Pune News:
तरुण मुलाच्या निधनाचे दुःख बाजूला सारून एका पित्याने माणुसकीचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. "माझ्या मुलाच्या रूपाने कुणाला तरी दृष्टी मिळेल आणि त्याला मी कोणामध्ये तरी पाहीन..." असे म्हणत रमेश गाडे यांनी अवयवदानाचे महान कार्य केले आहे. बीडमधील राक्षसभुवन येथील संग्राम रमेश गाडे या 21 वर्षीय तरुणाच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे पाच गरजू रुग्णांना नवे आयुष्य मिळणार आहे.

संग्राम गाडेचे अपघाती निधन 

संग्राम गाडे याचा 5 मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्याला तातडीने पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली, पण तरीही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने संग्राम हा 'ब्रेन डेड' (Brain Dead) असल्याचे घोषित केले. ही माहिती समजताच गाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

गाडे कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय

पुण्यातील उपचारानंतर संग्रामला बीडच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. येथे जिल्हा शल्यचिकित्सक आणि डॉक्टरांच्या पथकाने संग्रामच्या पालकांशी संवाद साधला. डॉक्टरांनी अत्यंत संवेदनशीलतेने अवयवदानाचा विषय काढला आणि "तुम्ही मुलाचे डोळे दान करू शकता का?" असा प्रश्न विचारला. त्यावर वडील रमेश गाडे यांनी जे उत्तर दिले, ते ऐकून डॉक्टरांचेही डोळे पाणावले.

रमेश गाडे म्हणाले, "माझ्या मुलाचे फक्त डोळेच नाही, तर पूर्ण शरीरच मी दान करत आहे. जे शरीर मातीत मिसळून जाणार आहे, ते जर कुणाच्या तरी कामाला येत असेल, तर त्यापेक्षा मोठे पुण्य काय असू शकते? माझ्या काळजावर दगड ठेवून मी हा निर्णय घेत आहे, जेणेकरून माझ्या मुलाच्या रूपाने पाच जणांना जीवदान मिळेल."

(नक्की वाचा: Pune News: पुण्याच्या मिस इंडिया अर्थचा होमहवन करत हिंदू धर्मात प्रवेश, पती आतिफवर गंभीर आरोप; छळाची मांडली आपबिती)

पाच रुग्णांना मिळणार नवे आयुष्य 

रमेश गाडे आणि त्यांच्या पत्नीने दाखवलेल्या या प्रचंड मोठ्या मनामुळे संग्रामचे अवयव आता पाच रुग्णांना दान केले जाणार आहेत. यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण केली.  

समाजसेवेचा आदर्श

बीडसारख्या ग्रामीण भागात अवयवदानाबाबत अजूनही अनेक गैरसमज आहेत. अशा परिस्थितीत एका सामान्य कुटुंबाने घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी मानला जात आहे. "माझा मुलगा आता या जगात नाही, पण तो कुणाच्या तरी अवयवांच्या रूपाने जिवंत राहील," ही भावना रमेश गाडे यांनी व्यक्त केली. या धाडसी आणि समाजोपयोगी निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून गाडे कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com