जाहिरात

Parbhani Accident: परभणीत कावड यात्रेत भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

सेलू तालुक्यातील भाविक श्रावण मासानिमित्त पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे पोहोचले होते. सोमवारी पहाटे हे भाविक कावड घेऊन पायी सेलूकडे परत जात होते.

Parbhani Accident: परभणीत कावड यात्रेत भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

दिवाकर माने, परभणी

श्रावण महिन्यातील कावड यात्रेदरम्यान परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. खेडुळा फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे एक कार कावड घेऊन चालणाऱ्या भाविकांवर आदळली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन ते चार भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तात्काळ उपचारासाठी सेलू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

( नक्की वाचा: कोकणात जाणे दुबई-सिंगापूरपेक्षाही महाग; तिकिटाचे दर पाहून गणेशभक्त गरगरले! )

सेलू तालुक्यातील भाविक श्रावण मासानिमित्त पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे पोहोचले होते. सोमवारी पहाटे हे भाविक कावड घेऊन पायी सेलूकडे परत जात होते. सकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास, पाथरी शहरापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर खेडुळा पाटीजवळ त्यांच्यासोबत असलेली एक कार एका अज्ञात वाहनाला धडकली. या धडकेनंतर कारवरील नियंत्रण सुटले आणि ती पायी चालत असलेल्या भाविकांवर आदळली.

या अपघातात एकनाथ गंगाधरराव गजमल आणि ऋषिकेश सुरेशराव शिंदे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघेही सेलू तालुक्यातील रहिवासी होते. या घटनेनंतर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पाथरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाथरी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. तसेच, जखमींना उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले आहे.

(नक्की वाचा- Sanjay Raut: जगदीप धनखड कुठे आहेत? सुरक्षित आहेत का? संजय राऊतांनी का व्यक्त केली चिंता?)

या संदर्भात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फरार झालेल्या चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे कावड यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com