Yavatmal News: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. सर्वत्र सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी होत असतानाच यवतमाळ शहरात त्यांच्या पुतळ्यावरुन मोठा वाद झाला आहे. यवतमाळच्या स्टेट बँक चौकात उभारण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा कोणतीही प्रशासकीय परवानगी नसल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने अचानक पुतळा हटवण्याची मोहीम हाती घेतली. ज्यामुळे हा वाद झाला.
सावित्रीबाई फुलेंचा पुतळा हटवण्यावरुन वाद..
समोर आलेल्या माहितीनुसार, यवतमाळ शहराच्या स्टेट बँक चौकामध्ये असलेल्या खुल्या जागेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळ्याचे आज अनावरण होणार होते, मात्र प्रशासनाने पुतळा उभारताना कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे कारण पुढे करत हा पुतळा हटवण्याची मोहीम हाती घेतली. यावेळी प्रशासनाकडून पुतळा हटविण्याच्या संदर्भात देखील कुठलीही शासकीय अनुमती किंवा निर्णय यावेळी दाखविली गेली नाही, असा पुतळा स्थापन करणाऱ्यांकडून पलटवार करण्यात आला.
शनिवारी 3 जानेवारीला याच ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते. मात्र आदल्या रात्रीच पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला असून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुतळा काढण्याची सुरुवात करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना यावेळेस आंदोलन चांगले संतप्त झाल्याचे पहावयास मिळाले. शनिवारी या पार्श्वभूमीवर आंदोलन आणि वादंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परिसरात तणाव..
दरम्यान, पुतळा हटवण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही लेखी परवानगी किंवा आदेश यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आले नाहीत. यामुळे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. परिस्थिती लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुतळा काढण्यास सुरुवात करताच आंदोलन अधिकच तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. या संपूर्ण प्रकारावर आंदोलकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
Akola News : समलिंगी नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश, संशयाचं भूत अंगात संचारलं अन् अकोला हादरलं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world