Year Ender 2024: संघर्ष, कुरघोड्या अन् अस्तित्वाची लढाई! 'या' 10 घडामोडींनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळलं

लोकसभा, विधानसभेचे अनपेक्षित निकाल, दिग्गजांच्या साम्राज्याला बसलेला हादरा यासह, अनेक घटक पक्षांचे अस्तिस्वच पणाला लागल्याचे पाहायला मिळाले. वाचा 2024 मधील महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्याा मोठ्या घडामोडी:

जाहिरात
Read Time: 6 mins

Top 10 Political Happenings in Maharashtra 2024: वर्ष संपायला अवघे काही दिवस उरलेत. सरत्या वर्षाला निरोप देताना अन् नव्या वर्षाचे स्वागत करण्याआधी वर्षभर कोणत्या क्षेत्रात काय घडलं? याचा आढावा घेणंही महत्त्वाचं आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती राज्याचे राजकारण अन् अनेक वादळी, तितक्याच धक्कादायक घडामोडींची. लोकसभा, विधानसभेचे अनपेक्षित निकाल, दिग्गजांच्या साम्राज्याला बसलेला हादरा यासह, अनेक घटक पक्षांचे अस्तिस्वच पणाला लागल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊया 2024 मधील महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्या लक्षवेधी घडामोडी: 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1. राममंदिर प्राणप्रतिष्ठा, उद्धव ठाकरे, शरद पवारांची गैरहजेरी: 

2024 च्या सुरुवातीलाच अयोध्येमध्ये प्रभु श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री राम मंदिरात रामलल्लांच्या  मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशभरातील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांनाही देण्यात आले होते. मात्र महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी याकडे पाठ फिरवली, ज्यामुळे राज्यात भाजप- विरुद्ध ठाकरे असा वादही रंगल्याचं पाहायला मिळाले.

शरद पवारांना तुतारी चिन्ह मिळालं, नव्या पक्षाचा उदय:

अजित पवार यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे नवे चिन्ह दिले. या नव्या चिन्हासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची नव्याने मोर्चेबांधणी अन् राजकीय वाटचाल सुरु झाली. 

(नक्की वाचा-  Chhagan Bhujbal: CM फडणवीसांनी शब्द दिला.. मुख्यमंत्र्यांसोबत काय झाली चर्चा? छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं)

मनोज जरांगेंचे आंदोलन, मराठा- ओबीसी संघर्ष: 

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उगारलेल्या उपोषण अस्त्राने राज्याचे राजकारण यंदाही ढवळून निघाल्याचे पाहायला मिळाले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत मनोज जरांगेंनी सरकारला धारेवर धरले. जरांगेंच्या या मागणीला ओबीसी बांधवांनी जोरदार विरोध करत मोठे आंदोलन उभे केले. यामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते छगन भुजबळ असा जळजळीत संघर्ष पाहायला मिळाला. 

Advertisement

मनोज जरांगे- छगन भुजबळांमध्ये झालेले शाब्दिक हल्ले- प्रतिहल्ल्यांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले. दुसरीकडे मनोज जरांगेंना आव्हान देण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही दंड थोपटले, ज्यामुळे राज्यभर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष रंगला. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलवत मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर केले. या विधेयकामध्ये मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद होती, मात्र या आरक्षणावर तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केल्याने मनोज जरांगेंनी पुन्हा आपला आरक्षणाचा लढा सुरुच ठेवला.

(नक्की वाचा-  Mahayuti Government : महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच; नव्या फॉर्म्युल्याने काढणार तोडगा?)

लोकसभा निवडणुकांची घोषणा: 

16 मार्च 2024 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे पाच टप्प्यात मतदान झाले.  निवडणुकीत जागा वाटपावरुन महाविकास आघाडीसह महायुतीत जोरदार कलह पाहायला मिळाला.

Advertisement

 पोर्शे अपघात अन् राजकीय घमासान: 

9 मे 2024 ला पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेने अवघा देश हादरुन केला.  पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने सुसाट वेगात पोर्शे कार चालवत दोघांना चिरडले. या घटनेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या आयटी व्यावसायिक आणि मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या तरुण- तरुणीचा मृ्त्यू झाला.

धक्कादायक बाब म्हणजे या घटनेतील अल्पवयीन आरोपीला अवघ्या काही तासात निबंध लिहण्याची शिक्षा देत जामीन मंजूर झाला अन् राज्यभरात संतापाचा भडका उडाला. राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी आरोपीला मदत केल्याचं समोर आल्यानंतर राज्याचे राजकार चांगलेच तापले. देशभरात या अपघाताची चर्चा झाली अन् याचाच मोठा फटका म्हणजे विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरेंचा पराभव झाला. 

Advertisement

(नक्की वाचा-  Air India Flight : प्रवासी विमानातचं 'झिंगाट'; 4 तासांच्या प्रवासात अख्खी दारु रिचवली, स्टॉकच संपला)


लोकसभेचा निकाल: 'मविआ'ची मुसंडी

4 जून रोजी देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत 400 पारचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात भाजपला यश आले मात्र या निवडणुकीने इंडिया आघाडीलाही बळ दिले. महाराष्ट्रामध्ये लोकसभेत सर्वात धक्कादायक निकाल लागले. 

राज्यात एकतर्फी होईल असं चित्र दिसत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने तब्बल 31 जागा जिंकल्या तर महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. शरद पवारांच्या तुतारीचा जोरदार आवाज, बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव, राधाकृष्ण विखे पाटील, रावसाहेब दानवे, भारती पवार, पंकजा मुंडे अशा दिग्गजांच्या साम्राज्याला बसलेला हादरा, शिंदेंची सरशी अशा काही महत्त्वाच्या घडामोडी या निकालाचे वैशिष्ट्य ठरल्या. 


शिवसेना- राष्ट्रवादी कोणाची? तारीख पे तारीख

 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी केलेले बंड राज्याच्या राजकारणात याही वर्षी चर्चेचा विषय ठरले. एकनाथ शिंदे- अजित पवार यांच्या बंडानंतर हे दोन्हीही पक्ष बंडखोरी करणाऱ्यांच्या ताब्यात देण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. दुसरीकडे एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आणि अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी दोन्ही पक्षांनी केली. 

यासंबंधी सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले. विधिमंडळात सुनावण्याझाल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूचे कोणतेही आमदार अपात्र होत नसल्याचा निकाल दिला. या निकालाविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. मात्र वर्षभर फक्त तारीख पे तारीख दिल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे अद्यापपर्यंत हा निकाल लागला नसून राज्यातील दोन महत्त्वाच्या प्रादेशिख पक्षांचे अस्तित्वच अधांतरी असल्याचं पाहायला मिळाले.

(नक्की वाचा- Pune Accident: पुण्यात हिट अँड रन! भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं, 3 जण ठार)


बाबा सिद्दीकींची हत्या, देश हादरला:

12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राष्ट्र काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी आली अन् अवघ्या काही तासात त्यांच्या निधनाच्या वृ्त्ताने अवघा देश हादरुन केला. वांद्रे परिसरात झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या भयंकर हत्येने राजकीय वर्तुळासह हिंदी सिनेसृष्टीही हादरुन केली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कुख्यात डॉन लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारत सलमान खानला मदत करत असल्यामुळे हे कृत्य केल्याची कबुली दिली. या हत्येप्रकरणी तीन जणांना तात्काळ अटक करण्यात आली. 

विधानसभेत महायुतीची त्सुनामी, मविआचा पाचोळा: 

लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली होती. दुसरीकडे महायुतीकडून अर्थसंकल्पात आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा दणक्यात प्रचार सुरु होता. राज्यात सत्ता बदलाचा दावा करत महाविकास आघाडीमध्ये अगदी मुख्यमंत्रीपदावरुन हाणामाऱ्याही झाल्या, मात्र 23 नोव्हेंबरला लागलेल्या निकालाने सर्वांनाच धक्का दिला. 

महायुतीच्या प्रचंड लाटेत महाविकास आघाडीची अक्षरश:धुळधाण झाली. या निवडणुकीत महायुतीने तब्बल 232 जागा मिळवत इतिहास रचला. यामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 132,शिवसेना शिंदे गटाने 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. दुसरीकडे मविआला फक्त 46 जागा जिंकता आल्या.

 यापैकी काँग्रेसने 16, शिवसेना ठाकरे गटाने 20 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 10 जागा मिळवल्या. विधानसभेच्या या निकालाने  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का दिला. निवडणूक प्रचारात अवघा महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाची झालेली पिछेहाट पाहता त्यांचे राजकीय करिअर संपल्याचीच चर्चा सर्वत्र रंगली.

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री:

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाच्या दावे प्रतिदाव्यानंतर पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

नक्की वाचा - Guardian Minister : खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय शिरसाटांनी आधीच केलं जाहीर