
दिवाकर माने, परभणी
Parbhani News : सततची नापिकी आणि कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. तर पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील ही घटना आहे. सचिन बालाजी जाधव आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सचिन जाधव याने माळसोन्ना शिवारातील शेतीवर बहिणीच्या लग्नासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज काढले होते. बँकेचं कर्ज कसं फेडायचं असं तो वडिलांना नेहमी विचारत असे. या विवंचनेतून तणावाखाली येऊन फवारणीचे विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्याला परभणीतील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारदरम्यान सोमवारी रात्री सचिनचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा- गाईच्या मृत्यूवरही कमाई, पशू वैद्यकीय अधिकाऱ्याने गुगल पेवरुन घेतली लाच)
दरम्यान, पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याची पत्नी ज्योती हिने देखील विष घेतले. तिच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे. याबाबत सचिनचा भाऊ भागवत बालाजी जाधव याने दिलेल्या माहितीवरून दैठणा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वर्षभरात 2706 शेतकऱ्यांची आत्महत्या
1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान राज्यात एकूण 2706 शेतकरी आत्महत्या झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. म्हणजेच 8 शेतकरी रोज राज्यात आत्महत्या करतात. त्यात मराठवाडा छत्रपती संभाजीनगर विभागात 952 शेतकरी आत्महत्या वर्षभरात झाल्या आहेत.
(नक्की वाचा- Cabinet Meeting: यापुढे कोठडीत मृत्यू झाल्यास... राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय!)
अमरावती विभागात 1069 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. नापिकी, ओला आणि कोरडा दुष्काळ, कर्जबाजारीपणा ही शेतकरी आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. विधानभवनात मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही आकडेवारी दिली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world