जाहिरात
Story ProgressBack

Bhiwandi Lok Sabha : मोदींच्या सहकाऱ्यासमोर कडवं आव्हान, अंतर्गत राजकारणातून कशी उलटवणार बाजी?

निव्वळ संख्याबळाचा विचार केला तर ही निवडणूक भाजपाला सोपी असेल असा समज होईल. पण, तो खरा नाही.

Read Time: 3 min
Bhiwandi Lok Sabha : मोदींच्या सहकाऱ्यासमोर कडवं आव्हान, अंतर्गत राजकारणातून कशी उलटवणार बाजी?
प्रातिनिधीक फोटो

मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 साली ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हा नवा लोकसभा मतदारसंघ झाला. त्यावर्षी झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे विजयी झाले.  2014 साली देशभरातील मोदी लाटेचा फायदा घेत भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांनी इथून बाजी मारली. त्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून पाटील भिवंडीचे खासदार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये पाटील यांना मंत्रिपदही मिळालं. शहरी, निमशहरी, आदिवासी, आगरी आणि मुस्लीम समाजाची मोठी संख्या आहे. 

काय आहेत प्रश्न?

भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात गोदाम आणि कारखाने आहेत. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न मोठा आहे. त्याचबरोबर अनेक ग्रामीण भागात रस्ते नाहीत. आदिवासी भागात पाण्याची समस्या गंभीर आहे.  या मतदारसंघातील आदिवासी सामान्य नागरी सुविधेपासूनही वंचित आहेत.  त्यांना उपचारासाठी चांगले शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे त्यांना ठाण्यातील जिल्हा रुग्णालायात उपचारासाठी खेपा माराव्या लागतात. त्याचबरोबर कुपोषण, माता मृत्यू, बालमृत्यू , अल्पवयीन लग्न यासारख्या सामजिक प्रश्नांनीही भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदार त्रस्त आहेत.  

कोणत्या पक्षाचे किती आमदार?

भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व आणि भिवंडी ग्रामीण या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. यामधील कल्याण पश्चिममध्ये विश्वानाथ भोईर (शिवसेना),  शहापूरमध्ये दौलत दरोडा (राष्ट्रवादी), मुरबाडमध्ये किसन कथोरे (भाजपा), भिवंडी पश्चिम महेश चौगुले (भाजपा), भिवंडी पूर्व रईस शेख (समाजवादी पक्ष) आणि भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे (शिवसेना) हे आमदार आहेत. एकूणच भिवंडीतील सहापैकी पाच जागा या महायुतीकडं असून समाजवादी पक्षाला एक जागा आहे. तर महाविकास आघाडीचा या मतदारसंघात एकही आमदार नाही.

निव्वळ आमदारांचा विचार केला तर ही निवडणूक भाजपाला सोपी असेल असा समज होईल. पण, तो खरा नाही. कपिल पाटील यांना मंत्री करत ठाणे आणि परिसरात पसरलेल्या आगरी समाजाला खूश करण्याचा प्रयत्न भाजपानं केला. पण, पाटील यांना पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागतोय. 

मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे आणि कपिल पाटील हे सुरुवातीला राष्ट्रवादीमध्ये एकत्र होते.  दहा वर्षांपूर्वी सुरुवातीला कथोरे आणि नंतर पाटील भाजपात आले. मुरबाड-शहापूर भागात कथोरे यांचा प्रभाव आहे. पाटील यांच्या विजयातही त्याची मदत होती. पण गेल्या पाच वर्षांमध्ये परिस्थिती बदललीय. पाटील आपल्या मतदारसंघात हस्तक्षेप करुन श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा कथोरे यांचा आक्षेप आहे. 'आपण पाटील यांना पाडणार' असं कथोरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं. 

कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा पाटील यांच्यावर पुरेसा निधी न आणल्याचा आक्षेप आहे. शहापूरच्या दौलत दरोडा आणि पाटील यांचं पूर्वीपासूनच सख्य नाही. या कारणांमुळे कपिल पाटील यांना तिकीट मिळालं तर त्यांना विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागेल. 

विरोधकांचा उमेदवार कोण?

भिंवडी परिसरात एकेकाळी वर्चस्व असलेल्या काँग्रेसचा आता इथं एकही आमदार नाही. मुस्लीम आणि आदिवासी समाज ही काँग्रेसची पारंपारिक व्होट बँक होता. या व्होट बँकेला गेल्या काही निवडणुकांमध्ये तडा गेलाय. मतदारांना आपल्याकडं खेचण्यासाठी खंबीर नेता आणि संघटनात्मक शक्ती याचा काँग्रेसकडं अभाव आहे.   काँग्रेस कमकुवत झाल्यानं हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडं जाऊ शकतो. राष्ट्रवादीकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा म्हात्रे यांची या परिसरात चांगला प्रभाव आहे. त्यांना तिकीट मिळाल्यास ते महाविकास आघाडीकडून कपिल पाटील यांच्यासमोर तगडं आव्हान उभं करु शकतात. 

X फॅक्टर काय?

कपिल पाटील यांच्या या नाराजीचा फायदा उठवण्यासाठी नीलेश सांबरे यांनी मोठी तयारी सुरु केली आहे. या विभागातील मोठे कंत्राटदार असलेल्या सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कामांचा धडाका लावलाय. गावागावांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून आपल्या नावं पोहचवण्याची मोहीम सांबरेनी सुरु केलीय. सांबरे अद्याप कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालेलं नाही. ते अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले तर कुणाची मतं खाणार? पाटील यांच्यावरील नाराजीचा त्यांना फायदा होणार का? पक्षांतर्गत कुरबूरी शांत करण्यात भाजपाला यश मिळणार का? या प्रश्नांच्या उत्तरांवरच भिवंडीचा पुढचा खासदार कोण हे स्पष्ट होईल.

2019 चा निवडणुकीत कपिल पाटील यांना 5 लाख 23 हजार 583 मते पडली. यावेळी काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेल्या सुरेश तावरे यांना 3 लाख 67 हजार 254 मते पडली होती.तर वंचित आघाडी कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अरुण सावंत यांना 51 हजार 455 मते मिळाली होती.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination