विधीमंडळात गुरुवारी दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसले. केंद्रस्थानी होते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे. एकनाथ शिंदे यांनी 293 च्या चर्चेला उत्तर दिले. यावरून आपल्याला बोलायचे असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले. मात्र विधानसभा अध्यक्षांनी तुम्हाला तसे करता येणार नाही असं म्हटल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. हा गदारोळ सुरू असतानाच आदित्य ठाकरे सदनात आले आणि त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडे पाहात आता 'गद्दारांचे ऐकायचे का?' असा प्रश्न विचारला. यानंतर शिंदेंचे आमदार आक्रमक झाले ज्यामुळे सदनाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले होते.
( नक्की वाचा: राज्यातले मंत्री, मोठे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले!विधानसभेत नाना पटोलेंनी दाखवला पेन ड्राईव्ह )
नेमके काय झाले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 293 च्या प्रस्तावावर बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेला झोंबतील असे मुद्दे मांडत उत्तर दिले. ज्यामध्ये त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता म्हटले की, मतदाना आधी म्हणायचे मराठी मराठी, आणि मतदान झाले की 'कोण रे तू' अशी भूमिका तुमची. कोविड काळात खिचडी घोटाळा आणि डेडबॉडी बॅग चोरणारे सत्ताधारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत असे शिंदे यांनी म्हटले. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनो मोरिया याची चौकशी सुरू आहे. जर त्याने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल असा टोलाही शिंदे यांनी लगावला. त्यांचा रोख हा आदित्य ठाकरेंकडे असावा असा अंदाज बांधला जात आहे. शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना त्यावर बोलायचे होते, मात्र तसे करता येणार नाही असे विधानसभा अध्यक्षांनी नियमाचा हवाला देत सांगितले. यावरून गदारोळ सुरू असताना आदित्य ठाकरे सदनात आले आणि त्यांनी शिंदेंच्या आमदारांना पाहून आता 'गद्दारांचे ऐकायचे का?' असा प्रश्न विचारला.
( नक्की वाचा:मनसेच्या दणक्यानंतर मुजोर मारवाडी दुकानदार रातोरात गायब, दुकानही बंद )
शिंदेंच्या शिवसेनेचा आक्षेप
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्या वर्तनावर आक्षेप नोंदवला. विधानसभा अध्यक्षांकडे पाहून हातवारे करणे, इशारे करणे हे चुकीचे असून भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी गैरवर्तन केले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देसाई यांनी केली होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी आता पुढील कामकाजाकडे वळूया असे म्हणत गोंधळावर पडदा टाकला.