देवा राखुंडे, प्रतिनिधी
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या. या निकालानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीमधील काटेवाडीमध्ये आले होते. काटेवाडी हे पवार कुटुंबीयांचं गाव आहे. यावेळी झालेल्या सत्कार समारंभामध्ये शरद पवारांनी त्यांचं पुढचं लक्ष्य जाहीर करत अजित पवारांना खुलं आव्हान दिलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले शरद पवार?
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा मोठा फ्लेक्स लावण्यात आला आहे. शरद पवार यांनी हा विषय भाषणात मांडला. गावात फार बोर्ड लागलेत असं लोकं मला सांगतात, त्यांचा फलक हेच आपलं निवडणूकीचं यश आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला. कितीही फलक लावा पण निवडून कोण आलं? मतं कुणाली मिळाली असा प्रश्न शरद पवार यांनी यावेळी विचारला.
बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचं आव्हान मोडित काढल्यानंतर शरद पवारांनी आता त्यांचं लक्ष्य काटेवाडीमधील 'श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना' ताब्यात घेणं हे असल्याचे संकेत दिले आहेत. हा कारखाना सध्या अजित पवार यांच्या ताब्यात आहे.
( नक्की वाचा : भाजपा-राष्ट्रवादी युतीचं भवितव्य काय? दिल्लीतील बैठकीत झाला निर्णय )
आप्पासाहेब पवार असताना कारखाना चांगला चालवत होते आता काय झालं माहित नाही.उद्याची कारखान्याची निवडणूक तुमच्या संसाराची निवडणूक आहे त्यात लक्ष घालावेच लागेल काही नेते मंडळींनी कारखाने हातात ठेवले. एकेकाळी छत्रपती हा एक नंबर चा कारखाना होता आता कुठे गेला माहीत नाही. हे दुरूस्त करायचे असेल तर आपल्याला एकत्र रहावे लागेल, असं आवाहन पवारांनी केलं.
आज काही लोक इथे दिसत नाहीत. मात्र नव्या पिढीची, तरुणांची गर्दी आहे. नेते कुठे गेले माहीत नाही. जे असेल ते कष्टाने असेल. जिथे मलिदा गँगचा काही उद्योग असेल तो कोणाचाही असो त्यांना जागा दाखवू जागरुक रहा जागरुक राहून आपण चित्र बदलू सर्व निवडणूकीत जागरुक रहा त्यातून आपण महाराष्ट्राचं चित्र बदलू, असं पवारांनी यावेळी सांगितलं.
EXCLUSIVE: अजित पवारांचं भवितव्य काय? रोहित पवारांचं मोठं भाकित
'मोदीसाहेब आमच्यावर लक्ष ठेवा'
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी राज्यात 18 ठिकाणी आले. 18 पैकी 8-9 ठिकाणी शरद पवार हा एकच विषय होता. काट्याच्या वाडीतील चमत्कार त्यांना कळाला. मोदी साहेब यापुढील निवडणुकीत तुम्ही आमच्याकडे लक्ष ठेवा असं मी त्यांना सांगेल, त्यांनी लक्ष ठेवलं की मतं वाढतात, असा उपरोधिक टोला पवार यांनी लगावला.
या देशात लोकशाही आहे, जगातल्या अनेक देशात हुकुमशाही आहे. इथे हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न होता.पण तुमच्या शहाणपणामुळे या देशाची लोकशाही टिकली, असं पवार यावेळी म्हणाले. देशात कुठेही गेलो तरी बारामतीमध्ये काय होईल असं लोकं विचारायचे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही बारामतीची चर्चा होती, असं पवार यांनी या भाषणात सांगितलं.