शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे चाळीस पेक्षा जास्त आमदार घेवून बाहेर पडले. शिवाय एकनाथ शिंदे यानी शिवसेनेवर दावा केला. आपलाच पक्ष खरा शिवसेना असल्याचं त्यांनी सांगितलं. हा वाद निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देत शिवसेना पक्षा बरोबर धनुष्यबाण हे चिन्ही त्यांना देवू केले. याच चिन्हावर शिंदेंनी लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूक लढवली. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं जावू नये यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
एकनाथ शिंदे यांना दिलेलं शिवसेना पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं यासाठी ठाकरे गट थेट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ठाकरे गटाचे वकील सुप्रीम कोर्टाला याबाबत विनंती करणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात या आधीच याचिक दाखल करण्यात आली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणी पूर्वी ठाकरेंच्या वकीलांची दिल्लीत बैठक पार पडली.
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील करणारं असल्याची माहिती आहे. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह वापरण्यास बंदी घालण्यात यावी. या दोन्ही गोष्टी गोठवण्यात याव्यात अशी विनंती केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ही मागणी करणार आहे.
एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्यावर ठाकरे गटाचा आक्षेप आहे. त्यावरून पक्ष आणि चिन्ह चोरलं असा आरोपही ठाकरे गटाने केला होता. निवडणूक आयोगाने मात्र सर्वात जास्त आमदार शिंदें बरोबर असल्याने शिवसेना ही शिंदेंचीच असा निर्णय दिला होता. विधानसभा अध्यक्षांनीही आपलं मत हे एकनाथ शिंदे यांच्याच पारड्यात टाकलं होतं. नव्या चिन्हा मुळे ठाकरे गटाला फटका बसला होता. आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देवू केलं आहे. तर शिंदेंना धनुष्यबाण हे चिन्ह दिलं आहे.