महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. तर तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना क्लिन चिट देण्यात आली होती.यावरून मोठं राजकारणही झालं होतं. राजकीय वर्तूळात यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य करत या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला होता. या गौप्यस्फोटामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मात्र अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशमुखांचा गौप्यस्फोट काय?
अनिल देशमुख जळगाव इथे पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे तथ्यहीन होते. केवळ हवेतले ते आरोप होते. कोणतेही पुरावे नसताना आपल्याल खोट्या आरोपाखाली 14 महिने जेलमध्ये ठेवण्यात आले असेही ते म्हणाले. जो शंभर कोटींचा आरोप करण्यात आला त्या मागे देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी परमवीर सिंग यांना हा आरोप करायला सांगितला होता असा दावा देशमुख यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - मविआत मोठा भाऊ कोण? पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदाच थेट बोलले
आरोपानंतर फडणवीसांनी काय केलं?
शंभर कोटींचा आरोप केल्यानंतर फडणवीसांनी काही माणसं आपल्याकडे पाठवली होती असे अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यांच्याकडे एक पाकीट होते. त्यात एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहीलेला मजकूर हा धक्कादायक होता. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वर तुम्ही शंभर कोटी वसूलीचा आरोप लावा. तसं तुम्ही केल्यास ईडी, सीबीआय तुमच्या मागे काही लागणार नाही असा दावा देशमुख यांनी केला आहे. शिवाय फडणवीसांनी पाठवलेले पत्रातले मुद्दे आणि पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचा दावाही देशमुख यांनी केला आहे. या दाव्यामुळे भविष्यात फडणवीसांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
100 कोटीचे प्रकरण काय?
महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. त्याच वेळी तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहीले होते. या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंबईतले पब, हॉटेल आणि बारमधून दर महिन्याला 100 कोटी रूपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. असा आरोप सिंग यांनी या पत्रातून केला होता. त्यानंतर हे पत्र व्हायर झाले होते. या प्रकरणी देशमुख यांना राजीनामा ही द्यावा लागला होता. शिवाय सिंग हेही काही काळासाठी गायब झाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world