जळगाव ग्रामीण विधानसभा पूर्वी एरंडोल मतदार संघ होता. मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाले. धरणगाव तालुका व जळगाव तालुका मिळून जळगाव ग्रामीण मतदार संघ निर्माण करण्यात आला. जळगाव ग्रामीण मतदार संघात प्रामुख्याने शेतकरी मतदारांची संख्या ही मोठी आहे. विशेष म्हणजे जळगाव ग्रामीण मतदार संघात बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे त्यांचे जन्मगाव धरणगाव येते. शिवाय बहिणाबाई चौधरी यांचे जन्मगाव असोदा ही याच मतदार संघात आहे. तर बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याच मतदारसंघात येतं. त्यामुळे या मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2019 च्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा ज्ञानेश्वर महाजन यांच्यात लढत रंगली होती. मात्र ऐनवेळी भाजपात बंडखोरी करून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले चंद्रशेखर अत्तरदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ही निवडणूक चुरशीची झाली होती. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना 1 लाख 5 हजार 795 मतं मिळाली होती. तर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना 59 हजार 66 मतं मिळाली होती. 46 हजार 729 मतांनी चंद्रशेखर अत्तरदे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेसोबत सरळ लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पुष्पा ज्ञानेश्वर महाजन यांना केवळ 17 हजार 962 मतांवर समाधान मानावे लागले होते.
ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?
1999 मध्ये एरंडोल विधानसभा मतदारसंघ असताना शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे पहिल्यांदा या मतदारसंघात विजयी झाले होते. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ही गुलाबराव पाटील यांनी विजय मिळवला होता. मात्र 2009 मध्ये एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाले. धरणगाव व जळगाव तालुका समाविष्ट करत जळगाव ग्रामीण मतदार संघ हा निर्माण करण्यात आला. त्यावेळी मात्र गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी पराभव केला होता. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर असा सामना रंगला होता. त्यावेळी 31 हजार 367 मतांनी गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांचा पराभव केला होता.
ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जळगाव ग्रामीण मतदार संघ हा शिवसेना शिंदे गटाकडे कायम राहणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील हे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता, शिवसेनेच्या फूटीनंतर गुलाबराव पाटील यांनी ठाकरें ऐवजी शिंदेंना साथ दिली. पाटील जरी शिंदें सोबत असले तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी गुलाबराव पाटील यांच्यापासून दुरावली आहे. मतदार संघातील मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. सत्तांतरानंतर पाटीलयांना मतदार संघात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यांना शिवसैनिकांचा रोष ही सहन करावा लागला. पण काही काळातच ठाकरे गटातही अंतर्गत मतभेद उफाळून आले. त्यामुळे अनेक जण हे पुन्हा गुलाबराव पाटील यांच्याकडे परतले.
ट्रेंडिंग बातमी - गोंदिया विधानसभेत कमळ फुलणार? दोन अग्रवाल एकमेकांना भिडणार?
गुलाबराव पाटलांनी गद्दारी केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाकडून मात्र जळगाव ग्रामीण मतदार संघात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांना टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी शिवसेना ठाकरे गट हा आग्रही राहणार आहे. ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे इच्छुक आहेत. गुलाबराव वाघ यांनी देखील मतदार संघात भेटीगाठी वाढवल्या आहेत. तर या मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने यापूर्वीच दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे पुन्हा या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - हिंगोलीत इच्छुकांची मोठी गर्दी, आघाडी युतीत जागेसाठी चुरस
त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे हा मतदारसंघ गेल्यास गुलाबराव देवकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पण ऐनवेळी जळगाव शहर मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे तर ग्रामीण मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्यास गुलाबराव देवकर हे जळगाव शहर मतदार संघातून देखील इच्छुक आहेत. त्या अनुषंगाने शहर मतदार संघातही गुलाबराव देवकरांनी आपला जनसंपर्क वाढवला आहे. एकंदरीत पाहता जळगाव ग्रामीण मतदार संघात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट असो वा शिवसेना ठाकरे गट असो कोणाला ही जागा सुटल्यास सामना मात्र गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर किंवा गुलाबराव वाघ असाच होण्याची चिन्हे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world