जाहिरात
This Article is From Mar 12, 2024

वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र, फेसबूक पोस्टमध्ये नेमकं काय?

वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र, फेसबूक पोस्टमध्ये नेमकं काय?
पुणे:

पुण्यातले मनसेचे 'हातोडा' नेते वसंत मोरे (Vasant More) यांनीही अखेर मनसेला शेवटचा 'सप्रेम नमस्कार' केला आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक पत्र लिहून त्यांना राजीनामा पाठवला गेला आहे. विशेष म्हणजे वसंत मोरे यांनी सकाळी एक फेसबुक पोस्ट लिहिली त्यानंतर काही तासातच त्यांनी राजीनामा दिला. काही फोटोजही वसंत मोरे यांनी ट्विटर आणि फेसबूकवर पोस्ट केले होते. त्यात ते राज ठाकरेंच्या प्रतिमेसमोर उभे आहेत, दोन्ही हात जोडलेले आहेत आणि त्यानंतर जमीनीवर लोटांगण घालत दंडवत करत असल्याचेही फोटो आहेत. त्या फोटोनंतर वसंत मोरेंच्या मनसे सोडण्यावर शिक्कामोर्तब झालं. पुण्यात (Pune MNS) पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं वसंत मोरे यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे. मोरे आता पुढची राजकीय कारकिर्द अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु करतील असं जवळपास निश्चित झालं आहे.

वसंत मोरेंनी राजीनाम्यात काय म्हटलं आहे?

मा. राज ठाकरे,
संस्थापक अध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

विषय- माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणेसंदर्भात

आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र !

पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना त्या आधीपासून मी पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा प्रयत्न माझ्या परिने करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्षे सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात मी कार्यरत राहिलो. मात्र अलिकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो. त्यांना ताकद देतो, त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबले जात आहे. त्यामुळे मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

धन्यवाद
आपला विश्वासू
वसंत मोरे

फेसबुकवर चार ओळीची पोस्ट अन् 

वसंत मोरे यांची फेसबुक प्रोफाईल तगडी आहे. जवळपास पाच लाखाच्या आसपास त्यांचे फॉलोअर्स आहेत. ते मात्र कुणालाही फॉलो करत नाहीत. अगदी राज ठाकरेंचे किंवा मनसेचेही ती कुठली प्रोफाईल फॉलो करत नसल्याचं दिसतं आहे. त्यातच त्यांनी रात्री एक पोस्ट केली तीही बोलकी आहे. त्यात ते म्हणतात- एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो...त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. वसंत मोरेंच्या ह्या ओळी त्यांची मनसेत होत असलेली घुसमट दाखवणाऱ्या आहेत. ह्याच पोस्टमध्ये मोरेंनी 'मर्यादेच्या बाहेर' आणि 'अपेक्षा' असे दोन शब्द हे रेड केलेले आहेत. याचाच अर्थ असा की त्यांचा ह्या तक्रारीवर जास्त भर आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com