कल्याणमध्ये परप्रांतीय अखिलेश शुक्ला याने मराठी कुटुंबाला मारहाण करण्याची घटना ताजी असतानाच मुंबईत ही अशीच एक घटना आता समोर आली आहे. दक्षिण मुंबईत असलेल्या एक कंपनीत गेल्या 19 वर्षापासून मराठी कर्मचारी काम करतो. त्याला गेल्या सहा महिन्यापासून एक बिहारी मॅनेजर जाणीवपूर्वक त्रास देत आहे. अखेर या त्रासाला कंटाळून या मराठी कर्मचाऱ्याने शिवसेना ठाकरे गटाकडे धाव घेतली. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या कंपनीत धडक देताना शिवसेना स्टाईलने कंपनी मॅनेजमेंटला जाब विचारला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महेश पवार हे गेल्या 19 वर्षापासून या कंपनीत काम करत आहेत. ही कंपनी दक्षिण मुंबईत आहे. या कंपनीत नितीश कुमार हे कामाला आहेत. ते वरिष्ठ लॉजिस्टिक मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. हे गेल्या सहा महिन्यापासून महेश पवार यांना मानसिक त्रास देत आहेत. असा आरोप महेश पवार यांनी केला आहे. त्यांना वारंवार टॉर्चर केले जात आहे. त्यातून त्यांच्यावर मानसिक ताण येत आहे. त्यातून त्यांची तब्बेतही खालावली आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आले. त्यानंतर मॅनेजर असलेल्या नितीश कुमार यांनी एक बिहारी सबपे भारी असे सतत ऐकवत आहे. अशी पवार यांची तक्रार आहे. ही तक्रार त्यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे केली. त्यानंतर शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या कंपनीत धडक दिली. कंपनीच्या संबधित प्रमुखांची भेट घेतली. शिवाय त्या मॅनेजरलाही शिवसेना स्टाईलने समज दिली.
मंत्रालयातील अधिकाऱ्याची मराठी माणसाला मारहाण, कल्याणमधील प्रकार! मनसेनं दिला गंभीर इशारा
यावेळी एक निवेदनही देण्यात आले. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वच जण गुण्यागोविंदाने रहात आहेत. अशा स्थितीत जर मराठी माणसाला अशा प्रकारे कोणी त्रास देत असेल, त्याची गळचेपी केली जात असेल, तर मराठी माणूस शांत बसणार नाही. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव लढत राहील असे निवेदनही यावेळी देण्यात आले. शिवाय पुढे असं होता कामा नये अशी समजही देण्यात आली.
ट्रेंडिंग बातमी - Success story: आधी नापास झाला मग यशाचा मानकरी ठरला! शेतकऱ्याच्या लेकानं काय केलं?
त्या आधी कल्याणमध्ये ही एका परप्रांतीय सरकारी अधिकाऱ्याने मराठी कुटुंबावर हल्ला केला. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. त्याच्यावर कारवाई केली गेली. शिवाय त्याला अटक ही करण्यात आली. शिवसेना मनसेसह सर्वच पक्षांनी या घटनेचा निषेध केला. राज ठाकरे यांनी तर महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर त्याला मनसे जबाबदार राहाणार नाही असा इशार राज्य सरकारला दिला. शिवाय त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही केली. हे प्रकरण ताजे असताना आता हे मुंबईतले प्रकरणही समोर आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world