'भाजपा आमदाराने कोव्हिडच्या काळात मेलेल्या व्यक्तीच्या नावे पैसे काढले'

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

'भाजपाच्या एका आमदारानं कोव्हिड महामारीच्या काळात मेलेल्या व्यक्तींना जीवंत दाखवून शासनाच्या सवलतींच्या माध्यमातून पैसे काढले', असा  खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. विधानसभेतील चर्चेच्या दरम्यान पाटील यांनी हा आरोप केला. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे आरोप?

'कोव्हिडच्या काळात एका हॉस्पिटलने मृत रुग्ण जीवंत दाखवून शासनाच्या सवलतींचा लाभ घेत त्या सवलतीची पैसे खाल्ले आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी हे आपल्या सभागृहाचे एक सदस्य आहे आणि विशेष बाब म्हणजे ते सत्तेत महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या व्यक्तींचे निकटवर्तीय मानले जातात,' असा आरोप जयंत पाटील यांनी केलाय. 

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मौजे मायणी येथे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावाने वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे.  कोव्हीड - 19 च्या रुग्णांवर उपचार करताना या रुग्णालयाचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केल्याचे आढळून आले आहे, असा आरोप पाटील यांनी केला. 

( नक्की वाचा : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक )

या रुग्णालयाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी करारनामा करताना बोगस डॉक्टर दाखवले आहे. यातील डॉक्टर नमुद काळात सदर रुग्णालयात कार्यरत नव्हते व त्यांनी कोणत्याही रुग्णांवर कोणत्याही प्रकारचे उपचार केलेले नाहीत. रुग्णालयाच्या बॉडीने स्वतःच्या फायद्यासाठी सदर डॉक्टर्स रुग्णालयात उपचारासाठी नसतानाही डॉक्टरांची नावे दाखवली आहेत. तसेच सातारा जिल्हा परिषद यांच्याकडे रुग्णालय नुतनीकरणासाठी संस्थेच्या संचालक मंडळाचा कोणताही ठराव न घेता, खोटी कागदपत्रे दाखवून, बोगस डॉक्टर दाखवून 300 बेडचे रुग्णालय नुतनीकरण करून सदर नुतनीकरण प्रमाणपत्र हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी करार करताना जोडून शासनाची व संस्थेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली, असा आरोप आहे. 

Advertisement

मृत व्यक्तीला जीवंत दाखवून उपचार 

या रूग्णालयामध्ये कोव्हिड 19 काळात उपचारादरम्यान 200 ते 250 रूग्णांचा मृत्यू झाला होता. असे मृत्यू पावलेल्या रुग्णांना सुमारे दहा दिवस ते तीन महिन्यानंतर जीवंत आहेत असे दाखवून महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये दहा ते बारा दिवस उपचार द‍िला आहे असे दाखव‍िले आहे. सदर मृत रूग्णास डिस्चार्ज देताना सदर रूग्ण व्यवस्थित (STABLE) आहे असे दाखवून मयत झालेल्या रूग्णांच्या डिस्चार्ज फॉर्मवरती खोट्या सह्या केलेल्या आहेत. साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं तर मयत रुग्ण हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाले, मयत रुग्णांनी हॉस्पिटलमधे उपचार घेतले, शासकीय सवलतींचा लाभ घेतला इतकेच नव्हे तर महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या नियमानुसार रूग्णाचे समाधान पत्र घेतले जाते ते देखील भरुन द‍िले आण‍ि त्यानंतर  राज्य परिवहन नियमानुसार परतीचा प्रवास खर्च पन्नास रूपये याचा देखील लाभ घेतला, असा आरोप पाटील यांनी केला. 

Advertisement

( नक्की वाचा : 'तुम्ही जे पेरलं ते उगवलं' बजरंग सोनावणेंचा पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा )

या रुग्णालयात 7 व्हेंटीलेटर उपलब्ध होते या ह‍िशोबाने 10 द‍िवसांमध्ये फक्त 7 रुग्णच त्यावर उपचार घेऊ शकत होते. म्हणजेच जास्तीत जास्त 21 ते 30 रुग्ण त्याचा वापर करु शकत होते. परंतु व्हेंटीलेटरला 40 हजाराचे पॅकेज असल्याने द‍िडशे - दोनशे रुग्णांनी त्याचा वापर केला आहे असे दाखवून सरकारकडून पैसे उकळले आहेत, महाविकास आघाडी सरकारने कारवाई केली पण सत्तांतर झाले आणि कारवाई शिथिल केली, असा दावा पाटील यांनी केला.

Advertisement

आपलं सरकार इतके गतिमान आहे की त्यांनी मृत व्यक्तींचे देखील उपचार करण्याचे व त्यांना बरे करण्याचे कौशल्य साध्य केले आहे असा टोला त्यांनी सरकारला लगावला. हे सरकार सध्या कौशल्य विकासावर जास्त भर देत आहेत. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कौशल्य विकासासाठी एखादी समिती नेमावी आणि त्या समितीवर मृत व्यक्तींवर उपचार करण्याचे कौशल्य असलेल्या तुमच्या या सहकाऱ्याला अध्यक्ष म्हणनू नेमावे, मग पहा तुमचा कारभार कसा गतीमान होतोय असे म्हणत त्यांनी सरकारला चिमटा काढला.
 

Topics mentioned in this article