शुभम बायस्कार, प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (16 डिसेंबर) झाला. यावेळी भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात जातीय आणि विभागीय समीकरण राखण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पण, त्याचवेळी महायुतीमध्ये नाराजी नाट्य देखील सुरु झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. त्याचबरोर अमरावती जिल्ह्यातले मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार देखील मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'अधिवेशनात फिरकणार नाही'
अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा मतदारसंघातील आमदार रवी राणा मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झाले आहेत. राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. राणा यांच्या राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाची भाजपाशी युती आहे. ते बडनेरा मतदारसंघातून यंदा चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राणा यांचे नाव यंदा संभाव्य मंत्री म्हणून आघाडीवर होते. पण, त्यांना यंदा पुन्हा एकदा निराशा सहन करावी लागली.
मंत्रिपदाची संधी हुकल्यानं राणा नाराज झाले आहेत. ते रविवारी नागपूर सोडून अमरावतीमधील निवासस्थानी परतले आहेत. तसंच अधिवेशनाच्या पूर्ण कालावधीमध्ये नागपूरला जाणार नसल्याची माहिती राणा यांनी अनौपचारिक चर्चेच्या दरम्यान केली.
( नक्की वाचा : Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते पवारांचे विश्वासू, धनंजय मुंडेंचा संघर्षाचा प्रवास )
मंत्रिपद न मिळाल्याने रवी राणा समर्थक आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. राणा यांना मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, ते न मिळाल्यानं अमरावती जिल्ह्याचा विकास खुंटणार आहे, अशी प्रतिक्रिया राणांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. रवी राणा अमरावतीमधील निवासस्थानी असून ते दिवसभर कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत.
( नक्की वाचा : वडील आणि मुलासाठी काँग्रेस सोडावी लागणारे राधाकृष्ण विखे-पाटील भाजपाचे पॉवरफुल मंत्री कसे बनले? )
छगन भुजबळ नाराज
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झाले आहेत. होय मी नाराज आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलंल काय, फेकलं काय काय फरक पडतो? मला मंत्रिपदे किती आली किती गेली. छगन भुजबळ संपला नाही. मी कालपासून अजित पवारांसोबत काहीही चर्चा केली नाही. मला त्याची गरजही वाटत नाही, असे म्हणत छगन भुजबळांनी थेट अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world