जाहिरात

Buldhana News : शिवणकाम करून मुला-मुलींना शिकवलं; खामगावमध्ये एका सामान्य महिलेला भाजपानं दिलं तिकीट!

Maharashtra Local Body Election : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव नगर परिषदेमध्ये एका अतिशय सामान्य आणि कष्टाळू महिलेला भाजपने दिलेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे.

Buldhana News : शिवणकाम करून मुला-मुलींना शिकवलं; खामगावमध्ये एका सामान्य महिलेला भाजपानं दिलं तिकीट!
Buldhana News : खामगावमधील ही निवडणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
बुलडाणा:

अमोल सराफ, प्रतिनिधी

Maharashtra Local Body Election : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचाराची तीव्रता शिगेला पोहोचली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दिग्गज नेत्यांचे नातेवाईक किंवा मोठ्या राजकीय पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशा धामधुमीत, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव नगर परिषदेमध्ये एका अतिशय सामान्य आणि कष्टाळू महिलेला भाजपने दिलेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे. एका बाजूला मोठे राजकारणी आणि दुसऱ्या बाजूला केवळ शिवणकाम करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवणाऱ्या महिलेला मिळालेल्या या संधीमुळे राजकारणात एक सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

राजकारणाचा गंध नसतानाही मिळाली संधी

खामगाव नगरपरिषद निवडणुकीत ज्योती श्रीकांत भुसारी या शिवणकाम करणाऱ्या महिला भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर नगरसेवक पदासाठी स्वत:चो नशीब आजमावत आहे. पती श्रीकांत भुसारी यांची परिसरात समाजसेवक म्हणून ओळख आहे, तर ज्योती भुसारी स्वतः जुने-नवे कपडे शिवून आपला व्यवसाय करतात. या व्यवसायातून त्यांचा परिसरातील महिलांशी चांगला संपर्क वाढला आणि याच संपर्कातून त्यांना ही मोठी संधी चालून आली आहे. 

प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद

 राजकारणात तिकीट मिळवण्यासाठी अनेक मर्यादा ओलांडल्या जातात, पण खामगावमध्ये या उमेदवारीमुळे सकारात्मकता दिसून येत आहे. राजकारणाची पार्श्वभूमी नसलेल्या ज्योती भुसारी यांच्यासमोर मोठा विजय मिळवण्याचे आव्हान असले तरी, त्यांना परिसरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'NDTV मराठी'शी बोलताना ज्योती भुसारी यांनी सांगितले की, त्या आपला व्यवसाय सांभाळत आहेत आणि प्रचाराची धुरा देखील समर्थपणे पेलत आहेत. परिसरतील नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि प्रोत्साहनामुळे निश्चितच मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

( नक्की वाचा : Maharashtra Local Body Elections: 246 नगर परिषदा, 42 नगर पंचायतींसाठी मतदान 2 डिसेंबरला; वाचा A to Z माहिती )
 

ज्योती भुसारी यांचा प्रभागतील काँग्रेसच्या उमेदवाराशी थेट सामना होत आहे. त्यासोबतच अपक्ष आणि इतर छोट्या आघाडीच्या उमेदवारांना देखील त्या आपल्या प्रभावी प्रचारातून चांगल्या प्रकारे उत्तर देत आहेत. मतदारांना संबोधित करताना, 2 तारखेच्या मतदानानंतर 3 तारखेला निश्चित गुलाल उधळू, असा मोठा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

उच्च शिक्षण देणारी कष्टाळू आई

ज्योती भुसारी यांनी आपल्या कष्टाने आणि छोट्या व्यवसायातून दररोज दोन पैसे वाचवत आपला परिवार चालवला आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून, दोघांनाही त्यांनी उच्च शिक्षण दिले आहे. त्यांच्या या संघर्षाच्या आणि धडपडीच्या प्रवासाची परिसरातील नागरिकांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांना मोठी सहानुभूती आणि प्रोत्साहन मिळत आहे. परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा कष्टाळू आणि सामान्य व्यक्तीची आज नगरसेविका म्हणून गरज आहे. कारण, ज्यांना रोजच्या जीवनातील समस्यांची जाण आहे, अशाच व्यक्ती नागरिकांची कामे चांगल्या प्रकारे करू शकतात.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com