
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकाच स्टेजवर आले होते. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकाच राजकीय व्यासपीठावर आले होते. 'आज 20 वर्षांनी मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलंय,' या शब्दात राज यांनी या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. राज ठाकरे यांच्या टोलेबाजीवर तसंच या मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या विजयी मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हा विजयी मेळावा नसून रुदाली आहे, अशी टीका केली. ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय राज ठाकरेंनी मला दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, 'हा मराठीचा विजय उत्सव नव्हता. ही रूदाली होती, त्याचं दर्शन दिसून आलं आहे. मुळात 25 वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काम करू शकले नाहीत. पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा मोहरा बदलला, त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार झाला.
( नक्की वाचा: Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: एकत्र आले मात्र युती होणार? राज यांचा सावध पवित्रा )
आम्ही बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला पत्रा चाळीतील मराठी माणसाला, अभ्युदय नगरच्या मराठी माणसाला स्वतःच्या हक्काचे घर त्याच ठिकाणी दिलं, त्याची असूया त्यांच्या मनामध्ये आहे. पण मी नेहमी सांगतो पब्लिक सब जानती है. त्यामुळे मुंबईतला मराठी असो किंवा अमराठी सगळेच आमच्या सोबत आहेत. आम्ही मराठी आहोत. आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे. मराठी भाषेचा अभिमान आहे. त्याचवेळी आम्ही हिंदू आहोत. आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचे हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे हिंदुत्व आहे, ' असं फडणवीस यांनी सांगितलं.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
यापूर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. 'मी मुलाखतीत म्हटले होते की कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षानंतर उद्धव आणि मी एका व्यासपीठावर येतोय. जे माननीय बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचे ते देवेंद्र फडणवीसांना जमले.
कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. महाराष्ट्राकडे कोणीही वेड्यावाकड्या नजरेने पाहायचे नाही. हे सगळं अचानक कुठून आले हे कळालेच नाही. कशासाठी हिंदी ? कोणासाठी हिंदी ? लहान मुलांवर हिंदीची जबरदस्ती करताय? कोणाला काही विचारायचे नाही, आमची सत्ता आहे, बहुमत आहे आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. ' असं राज ठाकरे म्हणाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world