
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा पार पडला. तब्बल 20 वर्षांनी या मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यामुळे या मेळाव्याकडं संपूर्ण लक्ष लागलं होतं. हा मेळावा आता पार पडलाय. पण, या निमित्तानं तब्बल 20 वर्षांनी दोन भाऊ एकत्र येतायत म्हटल्यावर अनेक प्रश्न रांगेत उभे होते. त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं न देताच मेळावा संपला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहिला प्रश्न: महापालिका निवडणुका एकत्र लढणार?
या मेळाव्यात महापालिका एकत्र लढवण्याची घोषणा झाली नाही. एकत्र येण्याबद्दल उद्धव ठाकरे सकारात्मक होते. "एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी'' "आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ" "आमचा प्रीमियर वारंवार होईल" "म महापालिकेचाही आणि म महाराष्ट्राचाही" अशी सकारात्मक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केली. मात्र "मराठीसाठीची ही एकजूट कायम राहावी" एवढं एकमेक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. त्यामुळेच एकत्र येण्यासाठी उद्धव सकारात्मक पण राज सावध असा निष्कर्ष काढता येईल.
( नक्की वाचा: Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: एकत्र आले मात्र युती होणार? राज यांचा सावध पवित्रा )
दुसरा प्रश्न: दोघे भाऊ कायमचे एकत्र येणार का?
एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही दिसले. उद्धव ठाकरेंनी राज यांचं कौतुकही केलं. मात्र राज ठाकरे तेवढे सकारात्मक दिसले नाहीत. त्यांनी उद्धव ठाकरेंचं विशेष कौतुकही केलं नाही. त्यामुळे मेळाव्यापुरते भाऊ एकत्र आले, मात्र हेच चित्र भविष्यातही दिसेल का याबद्दल साशंकता आहे एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार, या प्रश्नाचं उत्तर मिळालं तरच दोघे भाऊ एकत्र येणार का, या प्रश्नाचंही उत्तर मिळेल.
तिसरा प्रश्न: उद्धव ठाकरेंबद्दल राज ठाकरेंची भूमिका सावध का होती?
दोघे एकत्र येण्याबद्दल राज ठाकरे खुलून बोलले नाहीत. वीस वर्षांनी मी आणि उद्धव एकत्र आलो, या व्यतिरिक्त कुठलंही भाष्य राज ठाकरेंनी केलं नाही. 2017 ला मनसेनं उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव पाठवला होता, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे राज ठाकरे साशंक आहेत का? मला गरज होती तेव्हा तुम्ही मदत केली नाही आता तुमच्या गरजेला मी मदत का करु, असा प्रश्न राज ठाकरेंच्या मनात आहे का ? हे प्रश्न निर्माण झाले आहेत. राज-उद्धव युतीची चर्चा सुरू झाल्यानंतरही राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती. त्यामुळे राज ठाकरेंना अजून काही वेगळा निर्णय घ्यायचाय का, याचे पत्ते उघड झाले नाहीत.
( नक्की वाचा : Devendra Fadnavis: 'मला श्रेय दिलं त्याबद्दल धन्यवाद...'ठाकरेंच्या मेळाव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया )
चौथा प्रश्न : उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार का?
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे कुठलेही संकेत उद्धव ठाकरेंनी दिले नाहीत. मात्र या मेळाव्याला काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता. तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. दुसऱ्याा पक्षांचे जे जे नेते मेळाव्याला उपस्थित होते, त्यांचा व्यासपीठावर बोलवून सन्मान करण्यात आला. मविआचं काय होणार, याचं उत्तर मिळालं नाही.
पाचवा प्रश्न: राज ठाकरे फडणवीस आणि शिंदेंची साथ सोडणार का ?
जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांवर टोलेबाजी केली. मात्र एकनाथ शिंदेंवर टीका केली नाही. तर एकनाथ शिंदेंनीही राज ठाकरेंवर टीका केली नाही, उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.
त्यामुळे राज ठाकरे शिंदे, फडणवीसांची साथ सोडतील, असे कुठलेही संकेत या मेळाव्यातून राज ठाकरेंनी दिलेले नाहीत. थोडक्यात दोन भाऊ एकत्र पण अजून स्पष्ट व्हायचंय महाराष्ट्राचं चित्र असाच निष्कर्ष या मेळाव्यातून काढावा लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world