रामराजे शिंदे, प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे शनिवारी दिल्लीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज (शनिवार) नीती आयोगाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला सर्वच राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनातील कल्चरल सेंटर इथं बैठक होणार आहे. बैठकीत महाराष्ट्रामधील प्रकल्पांविषयी चर्चा होणार आहे. कांदा प्रश्नी तोडगा काढण्याची
विनंती मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार आहे. शिवाय जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यावर भर दिला जाणार आहे.
नीती आयोगाच्या बैठकीत काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोगाच्या बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या बैठकीचे अध्यक्ष असणार आहेत. नीती आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणखी काही निधी मिळणार आहे का ? याकडे लक्ष असणार आहे. कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री या बैठकीत बोलणार आहेत. कांदा प्रश्नी तोडगा काढण्यावर विचार होणार आहे.
जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार?
त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत मुख्यमंत्री शिंदे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. महायुती म्हणून विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना आव्हानं, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तसेच जागा वाटप बाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.
दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती आणि विधानसभा निवडणुकीत 80 जागांची मागणी केली असल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. तर नारायण राणे यांनी भाजप सर्वाधिक जागा लढवणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे दिल्लीतील या बैठकांकडे लक्ष लागले आहे.
या दौऱ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांचीही भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
देवेंद्र फडणवीस भाजप राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत फडणवीस हजर राहतील. केंद्रांचे फ्लॅगशीप प्रोग्राम राबवणे आणि राज्यात भाजपचा विस्तार यावर चर्चा होणार आहे. भाजपच्या बैठकीनंतर शिंदे- फडणवीस आणि अजित पवारांच्या बैठका होणार आहेत.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून जोरदार खलबतं दिल्लीत होण्याची शक्यता आहे.