सागर कुलकर्णी
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती. या निवडणुकीत मते फुटणार हे निश्चित होते मात्र कोणाची ? याबाबत आडाखे बांधले जात होते. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्याच आमदाराने आमची मते फुटणार असे जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. मतमोजणीनंतर निकाल स्पष्ट झाले, तेव्हा शेकापचे जयंत पाटील पडल्याचे स्पष्ट झाले. मतमोजणीनंतर दिसून आले की काँग्रेसची काही मते फुटली आहेत. काँग्रेस पक्षाने आढावा घेतला असता आपली सात मते फुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काँग्रेस पक्षाला ही मते कोणाची होती हे देखील कळाले आहे. त्यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला. यानंतर पक्षश्रेष्ठींना या सात जणांपैकी काही आमदारांनी संपर्क साधला. ज्यानंतर सातपैकी 2 आमदारांना अभय दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणाची मते फुटली ?
काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांकेतिक पद्धतीने काही आमदारांकडे अंगुलीनिर्देश केला होता. त्यांच्या सांकेतिक भाषेचा उलगडा केला असता झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके , हिरामण खोसकर यांच्या नावांची चर्चा होऊ लागली. त्यात भर पडली ती मोहन हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर या दोघांच्या नावाची. या पाच जणांव्यतिरिक्त आणखी दोन काँग्रेस आमदार कोण?, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. याच दोन आमदारांना अभय दिले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस हायकमांडच्या खास मर्जीतील आणि मराठवाड्यातील एका आमदाराकडे संशयाचे बोट उचलले जात आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील एका वजनदार नेत्याचेही नाव चर्चेत आहे. या आमदाराच्या नावाचा उल्लेख 'त्यांचा' फोटोही पाहिल्यासारखे वाटते आहे, असे म्हणत शिवसेना (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांनीही केला होता.
ट्रेंडिंग बातमी - लंडनहून आणलेल्या महाराजांच्या वाघनखांचा साताऱ्यातील संग्रहालयात आज भव्य सोहळा
फुटीर आमदारांमुळे प्रामाणिक आमदारांवरही संशय
पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन मतदान केल्यामुळे काँग्रेस पक्षाची बदनामी झाली आहे. फुटीर आमदारांची नावे जाहीर केली नाही तर प्रामाणिक आमदारांवरही संशय व्यक्त केला जाईल आणि हे आमच्यासारख्या प्रामाणिक आमदारांसाठी फार वाईट बाब असेल, असे कैलास गोरंट्याल यांनी म्हटले होती. 19 जुलै रोजी काँग्रेसची बैठक होत असून यामध्ये या फुटीर आमदारांची नावे जाहीर करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यानुसार आज नावे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. जे काँग्रेस आमदार विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे, त्यांच्याविरोधात प्रामुख्याने कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभेच्या तयारीला सुरूवात, काँग्रेस पक्षाच्या आज 2 महत्त्वाच्या बैठका
दोन आमदारांना अभय का ?
पक्षाविरोधात मतदान केल्यानंतर या आमदारांनी आपल्यावर किंवा आपल्या आप्तेष्टांवर चौकशीचे गंडांतर असल्याने नाईलाजास्तव पक्षाविरोधात मतदान करावे लागल्याचे म्हटले. त्यांनी आपली भूमिका पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सांगितली आहे. हे आमदार असे आहेत की ज्यांच्या मतदारसंघात काँग्रेस खोलवर रुजली आहे आणि त्यांना बाजूला सारल्यास आगामी विधानसभेत त्याचा मोठा फटका बसू शकतो. यामुळे या दोन आमदारांबद्दल नरमाईची भूमिका काँग्रेस घेणार असल्याचे बोलले जात आहे. फारच दबाव आणला गेल्यास या दोन आमदारांना निलंबित केले जाईल. कालांतराने त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल अशी चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world