मंगेश जोशी, प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकींपासून गाजत असलेला एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश अद्यापही झालेला नाही. खडसे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती. तेंव्हापासून त्यांचा पक्षप्रवेश प्रलंबित आहे. खडसेंनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वाढदिवशी (2 सप्टेंबर) मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल नाही तर माझा मुळ पक्ष राष्ट्रवादी आहे तो जॉईन करुन मी राष्ट्रवादीमध्ये पुन्हा उत्साहानं काम करेल, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांनी भाजपा प्रवेश कुणामुळे रखडला हे जाहीर केलं आहे. खडसे यांनी यावेळी भाजपाच्या 2 बड्या नेत्यांची थेट नावं घेतल्यानं खळबळ उडाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले खडसे?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगाव जिल्ह्यातले बडे भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यामुळे आपला भाजपा प्रवेश रखडला असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. खडसे भाजपामध्ये असतानाही हे दोन नेते त्यांचे विरोधक मानले जात असत.
भाजप पक्ष प्रवेशाची मी स्वतःहून विनंती केली नव्हती तर भाजपच्याच दिल्लीमधील सर्वोच्च नेत्यांच्या आमंत्रणावरून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. पाच महिन्यापासून मी भाजप पक्षप्रवेशाची वाट पाहत असून पाच महिन्यात मला प्रवेश मिळू शकत नसेल तर मी राष्ट्रवादीत गेलो तर काय बिघडतं ?, असा सवाल खडसे यांनी विचारला आहे.
( नक्की वाचा : एकनाथ खडसेंचा भाजपामध्ये प्रवेश कधी होणार? बावनकुळेंनी दिलं उत्तर )
भाजपला मोठा करण्यात गेल्या 40 वर्षापासून माझं मोठे योगदान मात्र मेहनत घेणाऱ्यांना बाजूला टाकलं जातं. नवख्यांना मोठं केलं जातं हा कुठला न्याय? असा प्रश्नही त्यांनी विचारला. त्याचवेळी भाजपालाच माझी गरज नाही तर मी भाजपामध्ये का जाऊ असंही त्यांनी यावेळी म्हंटलं.
रक्षा खडसे काय म्हणाल्या?
दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल निर्णय हा पक्षात वरिष्ठ पातळीवरचा आहे. त्यावर आपण बोलणं योग्य ठरणार नाही. तेवढे आपण मोठे झालेलो नाही असेही रक्षा खडसे म्हणाल्या. मात्र पक्ष प्रवेशाबाबतचा विषय हा पक्षश्रेष्ठींपर्यंत गेला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world