रामराजे शिंदे
राज्यातील विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं तीन दिवस महाराष्ट्राचा दौरा नियोजित केला आहे. 26, 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. ॲाक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
26 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक होईल.दुपारी 1 वाजता सीईओ, नोडल अधिकाऱ्यांशी बैठक होईल. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी, आयकर विभाग, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे.
संध्याकाळी 5 वाजता मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी महत्त्वाच्या बैठका होती. यात राज्याच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल. निवडणुकीसाठी किती पोषक वातावरण आहे हे आयोग जाणून घेईल. त्यानंतर 28 सप्टेबरला सकाळी साडे नऊ वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेतील.त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीकडे रवाना होणार.
या दौऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही हरियाणा विधानसभे बरोबर घेण्यात आली होती. मात्र यावेळी तसे झाले नाही. यावेळी हरियाणा बरोबर जम्मू कश्मीरची विधानसभा निवडणूक होत आहे. महाराष्ट्रा बरोबर झारखंड विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. निवडणूक कधी घोषीत होते याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world