
देवा राखुंडे
महायुतीमध्ये इंदापूर विधानसभेची जागा सध्या वादाचा विषय ठरत आहे. या जागेवर भाजपच्या हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला आहे. अजित पवारांनी तर इंदापूरमधून दत्तामामा भरणे यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे अस्वस्थ आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांना अपक्ष किंवा तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. पाटील यांनीही निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. मात्र तुतारी की अपक्ष याबाबतचा निर्णय आपण पितृपंधरवडा संपताच घेणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हा मतदार संघ आपल्याला सुटावा यासाठी वाटही पाहाणार असल्याचे संकेत पाटील यांनी दिले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पितृपंधरवडा संपताच भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील मोठा राजकीय निर्णय घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर जाऊन तुतारी फुंकण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. इंदापूर तालुक्यातील वडापूरी येथे हर्षवर्धन पाटील यांनी मतदारांशी संवाद साधलाय आणि या संवादावेळीच कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी असा नाराही दिला. काही झालं तरी निवडणूक लढा असा आग्रह यावेळी कार्यकर्ते करत होते. त्याला पाटील यांनीही प्रतिसाद देत निवडणूक लढणार हे निश्चित केलं आहे.
2024 ची निवडणूक आपण लढवावी असा जनतेचा आग्रह आहे. कोणतं चिन्ह घ्यावं काय करावं याबाबत जनतेने स्पष्ट मत मांडले आहे. लोकशाहीत जनता श्रेष्ठ असते. जनतेचा जो आग्रह आहे त्याचा मी विचार करावा असं तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून माझ्यावर प्रेशर आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. पितृ-पंधरवाडा संपताचं याबाबतचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल. जनतेच्या मनामध्ये जे आहे त्याला मला डावलता येणार नाही. यावर योग्य तो निर्णय करून पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, काही लोकांचं म्हणणं आहे तुतारी सोबत चला. काही लोकांचे म्हणणे अपक्ष चला. काही लोकांचं म्हणणं आहे, इंदापूरची जागा आपल्याला सुटली पाहिजे. त्याचा सर्व विचार करून मी पुढील राजकीय निर्णय घेणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान पक्ष बदलाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवार माझ्याशी बोलणार होते. पण अद्याप त्यांनी कोणताही संपर्क केला नसल्याचे ही पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचं निमंत्रण मला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेले आहे.या निमंत्रणाचा स्वीकार मी केलाय. त्यामुळे शरद पवारांसोबत मी एका मंचावरती या कार्यक्रमाला जाणार आहे. असे सांगत आपली पुढची दिशा काय असेल याचेच संकेत तर पाटील यांनी दिले नाहीत ना अशी चर्चा आता मतदार संघात रंगली आहे. गेल्या काही महिन्यापासून पवार आणि पाटील यांच्यातील जवळीक वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world