अमजद खान
राज्यात शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात यांच्यात मोठं अंतर निर्माण झाले. दोन्ही पक्षाचे संबंध कसे आहेत हे जगजाहीर आहे. मात्र काही अशा देखील घटना घडतात, ज्यामध्ये या दोन्ही पक्षातील पदाधिकारी जवळ येताना दिसत आहे. जरी पक्ष वेगळे असले तरी कार्यकर्त्यांची मन अजून एकमेकांबाबत आदर व्यक्त करतात. अशीच एक घटना कल्याणमध्ये पाहायला मिळाली. ठाकरे गटाच्या शाखेचा वर्धापन दिन होता. त्यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे तिथे उपस्थित राहीले. त्यानंतर अरविंद मोरे यांनी ठाकरे गटाच्या विजय साळवी आणि अन्य पदाधिकाऱ्यां सोबत फोटो ही काढले. हे फोटो आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
संपूर्ण राज्यात शिवसेना फूटीनंतर शिंदे आणि ठाकरे गट यांच्यात काही कारणावरुन वाद समोर येत होते. मात्र कल्याण पश्चिम विधानसभा ज्या ठिकाणी विद्यमान आमदार हे शिदे गटाचे आहेत. शिवसेना फूटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेले. त्यानंतर यादोन्ही पक्षात वाद कधी दिसला नाही. पदाधिकाऱ्यांमध्ये एकमेकांवर टिकाही दिसून आली नाही. काही दिवसापूर्वी बकरी ईद निमित्त होणाऱ्या घंटा नाद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी एकत्रित दिसले.
आत्ता शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गट शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त पूजेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. या फोटोत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवे, शहर प्रमुख बाळा परब, दत्ता खंडागळे दिसून येत आहेत. या बाबत अरविंद मोरे यांच्याकडे विचारणी केली असता, त्या रस्त्याने जात होतो. एका शिवसैनिकाने आवाज दिला. मी पूजेत सहभागी झालो. यात कोणतेही राजकारण नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.
जरी शिवसेनेचे दोन तुकडे झाले असले तरी मुळ शिवसैनिक मात्र एकमेकांच्या संपर्कात आहे. ते आजही एकमेकांचा आदर करताना दिसत आहे. वरिष्ठ पातळीवर जरी मन दुभंगली असली तरी स्थानिक पातळीवर तशी स्थिती नाही.हेच कल्याणच्या उदाहरणावरून दिसून येते. त्यामुळे एक वेगळीच चर्चा सध्या राजकीय वर्तूळात रंगताना दिसत आहे.