- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तिन्ही समित्यांच्या सभापतीपदासाठी बिनविरोध निवडणुका पार पडल्या आहेत
- स्थायी समितीचे सभापतीपद शिवसेना शिंदे गटाच्या मल्लेश शेट्टी यांची निवड
- महिला बाल कल्याण समितीचे सभापतीपद शिंदे सेनेच्या सारीका जाधव यांची निवड
अमजद खान
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तिन्ही समित्यांच्या समभापतीपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. यात सर्वांचे लक्ष लागले होते ते म्हणजे केडीएमसीच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हातात जाणार याकडे. त्या दृष्टीने स्थायी समिती सभापतीपद हे महत्वाचे मानले जाते. अशा या महत्वाच्या स्थायी समिती सभापतीपदी शिंदे सेनेचे मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात ठेवण्यात शिवसेना शिंदे गटाला यश आले आहे. या पदावर भाजपने ही दावा केला होता. पण शेवटी शिवसेना शिंदे गटाने बाजी मारत तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात ठेवल्या आहेत.
या शिवाय महिला बाल कल्याण समिती सभापतीपदी शिंदे सेनेच्या सारीका जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तर शिक्षण समितीच्या सभापतीपदी भाजपचे अभिजीत थरवळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे तिन समित्यां पैकी दोन समित्यांवर शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे. तर एक समिती भाजपच्या पदरात पडली आहे. स्थायी समिती ही महापालिकेची तिजोरी असते. या तिजोरीच्या चाव्या शिंदे सेनेच्या हाती गेल्या आहेत. तर भाजपच्या वाट्याला केवळ शिक्षण समिती आली आहे.
महिला बाल कल्याण समितीही शिंदे सेनेच्या हाती गेली आहे. या तिन्ही समित्यांच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला होता. विरोधात एकही अर्ज आला नाही. त्यामुळे तिन्ही समित्यांची निवड बिनविरोध झाली. त्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. स्थायी समितीचे सभापती शेट्टी यांनी सांगितले की, सगळ्यांना विश्वासात घेऊन स्थायी समितीचे कामकाज केले जाईल. गेली पाच वर्षे निवडणूक पार पडलेली नव्हती. महापालिकेची आर्थिक स्थितीचा अभ्यास करुनच निर्णय घेतले जातील असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
शिक्षण मंडळाचे सभापती थरवळ यांनी सांगितले की, महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी काम करणार आहे. महापालिकेच्या शाळेत सामान्यांची मुले शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा पुरविण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. शिवाय शाळांचा दर्जा सुधारण्यावर ही आपला भर राहील असं ते म्हणाले. प्रथमच नगरसेवकपदी निवडून आल्यावर भाजप शिंदे सेना युतीने माझ्यावर विश्वास दाखवून महायुतीच्या नेत्यांनी मला सभापती पद दिले आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे आभार मानतो असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world