जाहिरात
Story ProgressBack

Loksabha Election: 62 वर्षांनंतर बदलणार इतिहास? नेहरुंच्या खास रेकॉर्डची बरोबरी करण्याची मोदींना संधी

वेगवेगळ्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील असा निष्कर्ष काढण्यात आलाय.

Read Time: 3 min
Loksabha Election: 62 वर्षांनंतर बदलणार इतिहास? नेहरुंच्या खास रेकॉर्डची बरोबरी करण्याची मोदींना संधी
मुंबई:

लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं असून देशात यंदा सात टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक वेळापत्रक जाहीर होताच प्रचाराला वेग आलाय. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तर विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात यंदा मुख्य लढत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएचे नेते आहेत.

वेगवेगळ्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील असा निष्कर्ष काढण्यात आलाय. तर विरोधी इंडिया आघाडीनं पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

मोदी करणार नेहरुंची बरोबरी?

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणुकीत उतरणाऱ्या एनडीएननं यंदा 543 पैकी 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं ध्येय निश्चित केलंय. भाजपानंही 370 जागा जिंकण्याचा निर्धार केलाय.

एनडीए हे लक्ष्य प्राप्त करणार की नाही हे 4 जून रोजी म्हणजेच निवडणूक निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. हे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांची सर्वाधिक भिस्त ही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे. मोदींना यंदा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची बरोबरी करण्याची संधी आहे.

कोणत्या रेकॉर्डची करणार बरोबरी?
 

पंडित नेहरुंचा अपवाद वगळता देशातील एकाही पंतप्रधानाला आजवर सलग तीन वेळा लोकसभा निवडणुका जिंकत पंतप्रधान होता आलेलं नाही.यंदाच्या निव़डणुकीत मोदींनी बहुमतासह सत्ता प्राप्त केली तर ते नेहरुंच्या या रेकॉर्डची बरोबरी करतील.

देशात पहिल्यांदा 1952 साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत काँग्रेसनं नेहरुंच्या नेतृत्त्वाखाली विजय मिळवला. त्यानंतर 1957 आणि 1962 सालीही काँग्रेसनं नेहरुंच्या नावावर निवडणूक लढवली आणि बहुमत प्राप्त केलं.

पंडित नेहरुंचं 1964 साली निधन झालं. त्यांच्या निधनानंतर लालबहाद्दूर शास्त्री पंतप्रधान झाले. शास्त्रीजींचे सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी 1966 साली निधन झालं. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या.

अन्य सर्वांना अपयश

इंदिरा गांधी यांनी 1967 साली सत्ता मिळवली. त्यानंतर 4 वर्षांनी झालेल्या भारत- पाक युद्धात पाकिस्तानची फाळणी झाली आणि बांगलादेशची निर्मिती झाली. त्यामुळे वाढलेल्या लोकप्रियतेचा फायदा घेत 1971 साली झालेल्या निवडणुकीत  त्यांना पुन्हा विजय मिळवला.

इंदिरा गांधींना 1977 साली लोकसभा निवडणुका जिंकण्याची हॅट्ट्रिक करता आली नाही. देशातील मतदारांनी पहिल्यांदाच काँग्रेसला सत्तेतून दूर केलं. खुद्द इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. 

1977 ते 1980 या कालावधीत जनता पक्षाचं सरकार होतं. मोरारजी देसाई आणि चौधरी चरणसिंह पंतप्रधान झाले. त्यांना पुन्हा सरकार स्थापन करण्यात आलं नाही.

1980 साली इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. त्यानंतर चार वर्षांनी दुर्दैवानं त्यांची हत्या करण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसला सहानभूतीच्या लाटेचा मोठा फायदा झाला.

राजीव गांधी यांनी 1984 साली झालेल्या निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा मिळवल्या. आजवर कोणत्याही एका पक्षाला लोकसभा निवडणुकीत इतकं यश मिळालं नाही.

राजीव गांधींना हे यश टिकवता आलं नाही. पाच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवता आलं नाही. त्यानंतर देशात काही काळ आघाडी सरकारचा काळ चालला.

वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांची संधी हुकली

अटल बिहारी वाजपेयी यांनी 1998 साली सहकारी पक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन केली. पण त्यांचं सरकार वर्षभरातच कोसळलं. 1999 साली लोकसभा निवडणुकीनंतर अटलजी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले.

नियोजित कार्यकाळ पूर्ण न करताही पंतप्रधानपद पुन्हा मिळवण्याचा विक्रम अटलजींनी केला. 2004 साली ‘इंडिया शायनिंग' च्या आधारावर सरकार स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि सलग तिसरी निवडणूक जिंकण्याची त्यांची संधी हुकली.

2004 साली डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचं सरकार स्थापन झालं. 2009 मध्येही त्यांनी पुन्हा सत्ता राखली. पण, 2014  साली तिसऱ्या प्रयत्नात त्यांचा पराभव झाला.

नरेंद्र मोदी यांनी 2014 आणि 2019 साली स्पष्ट बहुमत मिळवत सरकार स्थापन केलं. आता यंदाही तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवत पंतप्रधान होण्याच्या पंडित नेहरु यांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination