शिंदे-फडणवीस आणि अजित पवार सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली. मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विधवा, निराधार, घटस्फोटीत आणि 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आधार कार्ड, फोटो, रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला या कागदपत्रांची पूर्तता तहसील कार्यालयाकडे करावी लागणार आहे.
1 जुलैपासून अर्ज स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयात सुरूवात झाली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची वसमत तहसील कार्यालय परिसरामध्ये तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील तलाठी कार्यालयांमध्ये या योजनेत अर्ज करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच आता हिंगोलीच्या वसमत तहसील कार्यालयासमोरचा एक व्हिडिओ NDTV मराठीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एजंटकडून एका प्रमाणपत्रासाठी 400 रुपयाची मागणी केली जाते आहे. तर 2 प्रमाणपत्र काढण्यासाठी तब्बल 800 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे या गर्दीचा फायदा घेऊन महिलांकडून एजंट पैशाची लूट करताना पाहायला मिळत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या धक्कादायक प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - 'लाडकी बहीण' योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन
दुसरीकडे वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयातही महिलांकडून पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलाठी कार्यालयात महिलांकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आल आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी लाडली बहीण योजना सुरू केली आहे. राज्यभरात सर्वच महिला योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवा जुळव करीत आहे. परंतु वरूड तालुक्यात येत असलेले सावंगी गावातील तलाठी तुळशिराम कंठाळे हे आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी प्रत्येक लाभार्थी महिलांनकडून 50 रुपये घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान विधानसभेत त्या तलाठ्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world