संकेत कुलकर्णी
माढा लोकसभेची निवडणूक राज्यात चांगलीच गाजली. या मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बाजी मारत हा आपला गड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. आता विधानसभेचे वेध सर्वांना लागले आहेत. माढा विधानसभा मतदार संघही तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. विद्यमान आमदार बबन शिंदे हे राष्ट्रवादीचेच आहेत. मात्र त्यांनी राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांची साथ दिली. अशात या मतदार संघावर आता काँग्रेसने दावा केला आहे. माढ्याच्या काँग्रेस नगराध्यक्ष मीनल साठे यांनी मतदार संघात जनसंवाद यात्रा काढत विधानसभेची तयारी केली आहे. हा मतदार संघ काँग्रेसला सुटावा असे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना पाठोपाठ काँग्रेसनेही माढा मतदारसंघावर दावा केल्याने महाविकास आघाडी समोर आता पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माढा मतदारसंघ हा कायमच राज्यात चर्चेचा असतो. लोकसभा निवडणुकीतही माढा राज्यात चांगला चर्चेला गेला. अशातच या मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबन शिंदे हे अजित पवार गटात आहेत. मात्र ते सध्या शरद पवारांच्याही संपर्कात आहेत. शिवाय शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी या मतदार संघावर दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यामतदार संघातून अनेक जण इच्छुक आहेत. त्यांनी तयारीही सुरू केली आहे. शिवाय शरद पवारांच्या भेटीगाठी ही घेतल्या जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटातच एका पेक्षा जास्त इच्छुक असताना आता काँग्रेसच्या मिनल साठे यांनीही माढा मतदारसंघावर दावा केला आहे.
काँग्रेसच्या माढा शहराच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांनी थेट मतदार संघात जनसंवाद यात्रा काढली आहे. त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. गाव भेट दौरा करून काँग्रेस पक्षाची आणि आपली भूमिका साठे स्पष्ट करत आहेत. अशा परिस्थितीत या मतदारसंघात कुठल्याच पक्षाचे उमेदवार फिरत नसताना काँग्रेसने मात्र गाव भेट दौऱ्यात आघाडी घेतल्याचे दिसते. त्यामुळे या मतदार संघावर काँग्रेसचा होत असणारा दावा महाविकास आघाडीसमोर जागा वाटपात पेच निर्माण करणारा ठरू शकतो. शिवाय या मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचा अर्जही साठे यांनी पक्षाकडे दिला आहे.
ट्रेंडिंग बातमी - हॅलोsss मी मुंबई पोलीस बोलतो, एक फोन कॉल अन् निवृत्त मेजर जनरल झाला कंगाल
या मतदार संघावर नेहमीच राष्ट्रवादीचे वर्चस्व राहीले आहे. मात्र राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर इथली सर्व गणित बदलली आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. त्यात माढ्यात लोकसभा निवडणुकीचा निकाला पाहाता इथल्या मतदारांचा कल हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडेच अधिक राहीला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शरद पवार गटाकडून लढण्याचा अनेकांचा मानस आहे. त्यात आता काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. त्यातून मविआच्या नेत्यांना मार्ग काढावा लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world