Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने महाराष्ट्रातील वातावरण काय आहे? मतदारांच्या मनात काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी काँग्रेस पक्ष देखील दोन एजन्सीची नेमणूक करणार आहे. पक्षातील आमदारांचा सर्व्हे करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण कार्यास आता वेग आला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत काँग्रेसकडून एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे. प्रत्येक आमदाराचा सर्व्हे आणि अहवाल या एजन्सीमार्फत मागवला जाईल. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्याने पक्ष आता खडबडून जागा झाल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे पक्षातील नेत्यांना सर्व्हे करू न देण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता एजन्सी आमदारांचा सर्व्हे करणार आणि जो काही अहवाल प्राप्त होईल त्यानुसार तिकीट द्यायचे की नाही, हे ठरवले जाणार आहे.
(नक्की वाचा: 'मी सिनिअर, तरी दोघे माझ्या पुढे गेले' शिंदेंच्या कार्यक्रमात दादा - फडणवीसांची फटकेबाजी)
12 ऑगस्टपासून सर्व्हेला सुरुवात
महाराष्ट्र काँग्रेसची बैठक बुधवारी (7 ऑगस्ट 2024) मुंबईतील गांधी भवनात पार पडली. या बैठकीमध्ये 12 ऑगस्टपासून सर्व्हेला सुरुवात करण्याचे निश्चित झाले आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील 288 मतदारसंघापैकी काँग्रेस पक्ष किती जागा लढवू शकतो, कुठल्या मतदारसंघात चांगली ताकद आहे, कुठले मतदारसंघ कमजोर आहेत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी जनतेकडून त्यांच्या सूचना मागवण्यासंदर्भातही चर्चा झाली. जाहीरनामा तयार करण्यासाठी समिती तयार करण्यात आली असून या समितीचे अध्यक्षपद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना देण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेमध्ये पक्षादेश झुगारून 6 आमदारांनी सत्ताधारी महायुतीच्या बाजूने मतदान केलं होतं. काँग्रेस पक्षाने या प्रकरणाती दखल घेतली असून त्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत हे देखील निश्चित केलं आहे.
(नक्की वाचा: राज ठाकरे विश्रामगृहातून बाहेर पडले, समोर मराठा आंदोलन, नांदेडमध्ये काय झालं?)
'शेकाप'ला सोबत घेण्याचा निर्णय
विधानपरिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. या पराभवामुळे ते नाराज झाले आहेत. त्यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपल्या सगळ्या मित्रपक्षांना सोबत घेऊन चालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीतील सगळे घटकपक्ष एकसंधपणे लढवणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. काँग्रेस पक्ष किती जागा लढवणार हे निश्चित झाल्यानंतर मित्रपक्षांनाही सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जातील असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. शेकाप हा देखील काँग्रेस आणि मविआसोबतच असेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.