
विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. महायुतीची जागा वाटपाची चर्चाही सुरू झाली आहे. मात्र महायुतीत अशा अनेक जागा आहेत ज्या जागांवर काही ठिकाणी दोन पक्षांचा दावा आहे तर काही ठिकाणी तिनही पक्षांनी दावा सांगितला आहे. त्यावर तोडगा काढणे महायुतीसाठी कठीण झाले आहे. अशा स्थितीत विधानसभेच्या 25 जागांवर फ्रेंडली फाईट करावी असा प्रस्ताव प्रदेश भाजपानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर ठेवल्याचं समजत आहे. असे वृत्त द हिंदू या वर्तमान पत्रानं दिलं आहे. अमित शहा हे मुंबईत आले होते. या दौऱ्यादरम्यान दिल्लीला जाताना त्यांनी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक केली. त्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचं बातमीत म्हटलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीत जागा वाटपांवर चर्चा सुरु आहे. जवळपास 40 जागांवर ही चर्चा होतेय. त्यातल्या 25 जागा अशा आहेत, ज्यावर कमीत कमी दोन पक्षांचा दावा आहे. अशा सर्व जागांवर फ्रेंडली फाईटचा प्रस्ताव हाच पर्याय असल्याचं प्रदेश भाजपनं सांगितल्याचं दिसतंय. भाजपनं जवळपास पन्नास टक्के जागांचा निर्णय घेतला आहे. त्यात इंदापूर आणि अमरावतीच्या जागेवर अजून कोणताही निर्णय होवू शकलेला नाही. भाजप जवळपास 150 जागा लढणार असल्याचे समजत आहे. त्यात अजित पवारांच्या वाट्याल्या सत्तर जागा येतील अशीही चर्चा आहे. विद्यमान सर्व आमदारांना अजित पवार उमेदवारी देणार आहेत. त्यामुळे त्यांनीही जास्त जागांची मागणी केली आहे.
जास्त जागांची अजित पवारांची मागणी असली तरी चार ते पाच जागांची अदलाबदल करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. गेल्या वेळच्या काँग्रेसच्या कोट्यातील काही जागांवरही अजित पवारांनी दावा केला आहे. दरम्यान अमित शहा यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत विधान परिषदेच्या बारा जागांबाबतही चर्चा झाल्याचं समजत आहे. हे बारा आमदार राज्यपाल नियुक्त असतील. त्यातील सहा जागा या भाजपच्या पारड्यात जाणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांना तीन तर अजित पवारांना तीन जागा मिळणार आहेत.
ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?
महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे पक्ष आहेत. जास्त जागा आपल्या पदरात पडाव्यात अशी भूमिका या तिनही पक्षांची आहे. त्यानुसार प्रयत्नही सुरू आहे. शिवसेना शिंदे गटानं या आधीच शंभर जागा लढणार असल्याचं म्हटलं आहे. तर अजित पवार गटानं नव्वद जागा लढण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपनं तर दिडशे प्लसची घोषणाच दिली आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढती शिवाय पर्याय नाही असा सुर निघत आहे. त्यामुळे आता याची अंमलबजावणी होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world