
अमजद खान
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण डोंबिवली घरडा सर्कल येथे होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमात भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे मुंबईतील पक्षाच्या बैठकीचे कारण देत अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी या अनावरण सोहळ्याविषयी एक ट्वीट करीत, नाव न घेता राज्याचे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांना डिवचले आहे. त्यावरून सध्या डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असे चित्र निर्माण झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजेश कदम यांनी जे ट्वीट केले आहे, त्या ते म्हणतात, जे कोणाला इतके वर्ष जमले नाही ते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जमले. छत्रपती शिवरायांचे भव्य दिव्य अश्वारुढ शिल्प छत्रपती शिवाजी महाराज चौक डोंबिवली, असे ट्वीट केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. महापालिका निडणूकीच्या पूर्वी महायुतीतील भाजप शिवसेनेत आलबेल नसल्याचे उघड झाले आहे. कल्याण डोंबिवलीच्या राजकारण अनेक वर्षे शिवसेना भाजप सत्तेवर राहिली आहे. या दोन्ही पक्षात मतभेद वारंवार दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षापासून हे मतभेद चव्हाट्यावर अनेकदा आले.
दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकमेकांच्या नेत्यावर टिका करतात. नंतर पुन्हा सारवासारव करतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. डोंबिवलीत शिवसेनेचे तत्कालीन पदाधिकारी भाऊ चौधरी यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले होते. चौधरी याना काळे फासणारे भाजपचे माजी नगरसेवक होते. या प्रकरणानंतर राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर शिवसेना भाजपचे कधी आलबेल नसल्याचे दिसून आले. याचे एक कारण असे आहे की खासदार शिंदे आणि आमदार रविंद्र चव्हाण हे महायुतीतील नेते असले तरी या दोन्ही नेत्यांमध्ये कधी मनोमिलन झाले नाही.
ट्रेंडिंग बातमी - Aurangzeb News: 'औरंगजेब क्रूर कसा?' कबरीबाहेर व्यवसाय करणाऱ्यांचे काय आहे म्हणणे
याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आमदार चव्हाण यांना लक्ष्य करतात. सोमवारी संध्याकाळी घरडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. रविंद्र चव्हाण या कार्यक्रमास येतील असे बोलले जात होते. कार्यक्रमाच्या काही तासा आधी मुंबईत पक्षाची बैठक असल्याचे कारण देत, या कार्यक्रमास अनुपस्थित राहाणार असल्याचं सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी एक ट्वीट केले. त्याचा आशय हाच आहे की, 16 वर्षापासून रविंद्र चव्हाण हे आमदार आहेत. त्यांना हे जमले नाही. या ट्वीटनंतर शिवसेना भाजपमध्ये पुन्हा वादाचा ठिणगी पडणार असल्याचे उघड होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world