Manoj Jarange Patil Full Speech : मराठ्यांना सगेसोयऱ्यांसह आरक्षण देण्यासाठी 13 तारीख दिली आहे. सरकारला जाहीर सांगतो, आजची रात्र तुमच्या हातात आहे. ठरलेल्या 9 मागण्या मान्य करा. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे. 288 आमदार पाडल्याशिवाय थांबत नाही,' असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठवाड्यात शांतता रॅली काढण्यात आली आहे. हिंगोलीपासून सुरुवात झालेल्या या शांतता रॅलीचा आज (शनिवार, 13 जुलै) छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत जरांगे-पाटील बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
20 तारखेपासून आमरण उपोषण
मनोज जरांगे यांनी या भाषणात महायुती सरकार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. आता महायुती आणि महाविकास आघाडीचं सरकार येत नसतं. मराठासारखी कट्टर जात पृथ्वीवर नसेल. येवल्यातील छगन भुजबळांच्या नादी लागून तुमची सत्ता जाणार. सरकारनं मराठ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला. 20 तारखेपासून अंतरवाली-सराटीमधून आमरण उपोषण सुरु करतोय, आता माघार नाही, अशी घोषणाही जरांगे यांनी केली.
20 तारखेला उपोषण सुरू करून त्या दिवशी बैठक कुठं घ्यायची याची तारीख जाहीर करणार. त्याचबरोबर मुंबईला कधी जायचं याची तारीख आपण ठरवणार आहोत. शिंदे आणि फडणवीस साहबे मराठे मुंबईत येऊ शकतात. मुंबईत आल्यावर कसं होईल? असा सवाल त्यांनी विचारला.
मी आडमुठा नाही, माझ्या जागी दुसरा असता तर एका दिवसांत धिंगाणा केला असता. मला अंतिम डाव टाकू द्या, सरकारनं दोन-तीन डाव टाकले आहेत. यांचे खासगी ड्रोन कशासाठी होते ते पाहूद्या. ज्या विभागच क्षेत्र नाही त्यांनी आरक्षणासाठी बैठका लावल्या, यांची काय नियत आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.
( नक्की वाचा : 'महाराष्ट्रात संवैधानिक घोटाळा सुरु आहे', OBC नेते लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप )
'जातीला बाप मानायचं'
शिंदे आणि फडणवीस साहेब लक्षात ठेवा तुम्ही आरक्षण द्या...नाहीतर ही गर्दी फक्त संभाजीनगरची आहे. 20 तारखेला पुढील बैठकीची तारीख ठरवली जाणार आहे. याच दिवशी मुंबईला जाण्याची तारीख ठरणार आहे. त्यामध्ये काहीही बदल होणार नाही. अनेक अधिकारी जातीवादी आहे, आता आपण देखील सहन करायचं नाही. एकमेकांना सहकार्य करायचं. आता पक्षाला बाप मानायचं नाही, जातीला बाप मानायचं, असं जरांगे यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world