महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आज दोन्ही पक्षांच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येणार आहे. याच दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठींसाठी उद्धव ठाकरे देखील दिल्लीत आहेत.
सेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात महत्त्वाचं ठरलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला होता. आमदार अपात्रता प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयानं काही निकष देखील घालून दिले होते. राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निकाल देताना शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं. तर, जुलै 2023 मध्ये शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यावेळी देखील राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रता प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं. या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने दाखल केली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आज दोन्ही पक्षांच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवार यांच्या गटाला नोटीस जारी केली होती. त्यामुळे सुनावणीत अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नोटीशीला उत्तर दिलं आहे का ते पाहावं लागणार आहे. ही सुनावणी दिल्लीत होत असताना उद्धव ठाकरे देखील दिल्लीत आहेत. ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
नक्की वाचा - 'मुख्यमंत्र्याचा गणपती करून समुद्रात उचलून टाकू', बच्चू कडू यांचा इशारा
उद्धव ठाकरे यांचा आज दिल्ली दौरा
शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौ-यावर येणार आहेत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यातच उद्धव ठाकरे पुढील तीन दिवस ते राजधानी दिल्लीत महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी दिल्लीत दाखल होणार, त्यांच्यासोबत पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील असणार आहेत.
सध्या संसदेच्या अधिवेशनात विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशावेळी उद्धव ठाकरे दिल्लीत येऊन तीन दिवस विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांसोबत भेट होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world