
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या विस्तारानंतर महायुतीत नाराजी नाट्य दिसून आले. शिवसेना शिंदेगटही त्याला अपवाद नव्हता. आम्हाला आश्वासन देवूनही मंत्रिपद देण्यात आले नाही असे काही आमदार थेट बोलत होते. त्यांची नाराजी कमी करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावलं उचलली आहेत. त्यांनी नाराज आमदारांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या मागठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे आणि विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत काय झालं याची माहितीही या दोघांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विजय शिवतारे हे शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ आमदार आहेत. त्यांनी या आधी राज्यमंत्री म्हणून कामही केलं आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये आपल्याला नक्की संधी मिळेल अशी त्यांना आशा होती. शिवाय आपल्याला तसे आश्वासन दिले होते असा दावाही शिवतारे यांनी केला होता. पण प्रत्यक्षात शिवतारे यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे ते संतप्त झाले होते. आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होते. आता दिलं तरी मंत्रिपद घेणार नाही अशी थेट भूमीका शिवतारे यांनी घेत आपली नाराजी जाहीर पणे व्यक्त केली होती. त्यानंतर आता शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माझ्या नावाची शेवटपर्यंत चर्चा होती. त्यामुळे मी नातवंडांना घेऊन आलो होतो. मात्र माझं नाव मंत्रिमंडळात नसल्याने मी नाराज झालो होतो. त्यातून उद्विग्नतेतून जे बोलायचं ते बोललो. मात्र मी शेवटपर्यंत एकनाथ शिंदे सोबत राहणार आहे असं त्यांनी भेटीनंतर स्पष्ट केलं.
प्रकाश सुर्वे यांनाही मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण त्यांनाही संधी मिळाली नाही. ते नाराज असल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये बोलवून घेतलं. त्यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना सुर्वे यांनी एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी यापेक्षा मोठे पद आमच्यासाठी कुठलेही नाही. असं सांगितलं. शिवाय दुनिया मे कितना गम है, मेरा गम फिर भी कम है, लोगो का गम देखा तो मै अपना गम भूल गया अशा शब्दात आपली नाराजी तर सुर्वे यांनी सांगितली, पण आता सर्व काही ठिक झाल्याचे संकेतही त्यांनी या निमित्ताने दिले.
दरम्यान नाराज आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. आपल्या वाट्याला आलेली मंत्रीपदं आणि इच्छुकांची संख्या याचं गणित एकनाथ शिंदे यांनी प्रकाश सुर्वे, विजय शिवतारे यांना समजावून सांगितलं. पुढच्या अडीच वर्षात तुम्हाला देखील संधी मिळू शकते, असं एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सांगितले. शिवाय कुणीतरी समजूतदारीने घ्यायला हवं असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. अडीच वर्षानंतर आम्हालाही मंत्रीपद सोडावे लागतील असं ही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी जर कुणाला शब्द दिला असेल तर अडीच वर्षानंतर त्यांना मंत्री पद मिळतील असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान पुढील एक दोन दिवसात खातेवाटप होईल असं त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world