जागावाटपाचं गुऱ्हाळ लवकर संपवा अन्यथा... राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळांचा थेट इशारा

Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट इशारा दिला आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्त्वाखाली NDA च्या सरकारनं शपथविधी घेतला. त्यानंतर लगेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वर्धापन दिन कार्यक्रमातही विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा प्रश्न उपस्थित झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपा आणि शिवसेनासोबत महायुती आहे. ही महायुती सध्या राज्यात सत्तेवर आहे. विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट इशारा दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले भुजबळ?

जागा वाटपाचं गुऱ्हाळ लवकर संपवावे अन्यथा त्याचा फटका बसेल. भाजपा मोठा भाऊ आहे हे मान्य आहे. आमचे 40 आमदार आहेत. शिंदेंचे देखील तितकेच आहेत. शिंदेना जितके तिकीट दिले किमान तितकेच सगळ्यांना मिळायला हवेत. एकमेकांना साथ देवून सत्ता स्थापन करावी, सगळ्या समाजाला साथ दिली पाहिजे, असं भुजबळ यांनी सांगितलं. 

लोकसभा निवडणुकीत मला भाषण करायला कमी संधी मिळाली.  मला बोलवले तर दुसरा समाज मतं देणार नाही, असं काही जणांना वाटत होतं. माझी मते पडली नाहीत, त्यांचीही मतं पडली नाहीत या मुद्याकडं भुजबळांनी यावेळी लक्ष वेधलं. 

( नक्की वाचा : NDA तील खदखद दुसऱ्याच दिवशी उघड, एकच मंत्रीपद मिळाल्यानं शिवसेना खासदार नाराज )
 

कोण काय म्हणते यापेक्षा एनसीपी म्हणून आपल्याला करावेच लागेल. दलित मुस्लीम आदिवासी भटक्या समाज आपल्या सोबत येतील याचा विचार करावा लागेल. युतीत काही गोष्टी मान्य कराव्या लागतील काही नाही, असं भुजबळ यांनी सांगितलं. 

Advertisement

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी निराशा सहन करावी लागली. त्यांचे सुनील तटकरे हे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत. संपूर्ण देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला.