![रोहित पवारांना पक्षसंघटनेतील कुठल्या पदाची अपेक्षा? NDTV मराठीच्या EXCLUSIVE मुलाखतीत स्पष्टच सांगितलं रोहित पवारांना पक्षसंघटनेतील कुठल्या पदाची अपेक्षा? NDTV मराठीच्या EXCLUSIVE मुलाखतीत स्पष्टच सांगितलं](https://c.ndtvimg.com/2024-06/7ekde0s8_rohit_625x300_19_June_24.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात संघर्ष सुरू असल्याचंही म्हटलं जात होतं. दरम्यान रोहित पवारांनी एका मुलाखतीत त्यांच्याकडे पक्षसंघटनेतील कोणतंही पद नसल्याने खंत व्यक्त केली होती. NDTV मराठीला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत त्यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्या पक्षसंघटनेतील कोणतं पद हवं आणि का हवं याबाबत स्पष्टीकरण रोहित पवारांनी यावेळी केलं.
रोहित पवारांनी यावेळी पक्षसंघटनेतील पदाबाबत अपेक्षा व्यक्त केली. मला अध्यक्षपद नको. प्रदेश अध्यक्षपद महत्त्वाचं असतं त्या पदाचं स्वप्नही मला पडत नाही. माझ्या वयात ते योग्यही नाही. या पदासाठी पक्षात अनेक अनुभवी लोक आहेत. मात्र कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी संघटनेत पद असणं आवश्यक आहे. पदाच्या माध्यमातून निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना न्याय देता येईल. संघटनेत जनरल सेक्रेटरी पद मिळालं तर बऱ्याच गोष्टी साध्य करता येईल असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
नक्की वाचा - इंदापूरची जागा वाढवणार महायुतीची डोकेदुखी, पवार-फडणवीस कसा सोडवणार तिढा?
पक्षसंघटनेतील पदाची का आहे अपेक्षा?
रोहित पवारांनी सार्वजनिकपणे पदाची अपेक्षा व्यक्त केली यावरूनही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र काही निर्णय घेण्यासाठी पद आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक आमदार निवडून यावेत, महाविकास आघाडीची सत्ता यावी आणि जनतेला दिलेले शब्द पाळला जावा हाच मुख्य हेतू आहे. युवा संघर्ष यात्रेदरम्यान स्थानिक पातळीवर जनतेशी संवाद साधला. यावेळी निवडणुकीपूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात खूप फिरलो. त्यावेळी अनेकजणं आम्हाला सोडून गेले. मात्र अनेक निष्ठावंत आपल्यासोबत राहिले. यादरम्यान अनेकांवर कारवाईची टांगती तलवार होती. मात्र तरीही ते आम्हाला सोडून गेले नाही. धमक्यांना घाबरले नाहीत. अशा निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना न्याय देता यावा, यासाठी पक्षसंघटनेतील पद आवश्यक असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.
मी युवा नेता असल्याने आक्रमक राहिलो आहे. मात्र पद असणाऱ्यांना काही मर्यादा येतात. मात्र माझ्याकडे पद नसल्याने एक युवा नेता म्हणून नेहमी आक्रमक आणि रोखठोक राहिलो असल्याचं रोहित पवार यावेळी म्हणाले. दुसरीकडे पद द्यायचं की नाही याचा निर्णय जयंत पाटील, शरद पवार आणि सुप्रिया सुळे घेतील. मात्र पद दिलं नाही तरी पक्षाचं काम तितक्याच ताकदीने करू असं म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world