लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यानुसार विधानसभेची तयारीही सुरू झाली आहे. पण लोकसभा निवडणुकीत ज्यांच्याकडून दगा फटका झाल्या त्यांचे हिशेब चुकते करण्याची रणनितीही आखली जात आहे. कोकणात त्याचा प्रत्येय येतो. नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा रत्नागिरीत नुकताच सत्कार पार पडला. यावेळी निलेश राणे यांच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'ज्यांनी आमची वाट लावण्याचा प्रयत्न केला, त्यांची वाट लावल्या शिवाय राहाणार नाही'असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील तीनही मतदार संघातून आघाडी मिळाली नव्हती. याला पालकमंत्री उदय सामंत जबाबदार असल्याचा राणेंचा आरोप आहे. तो राग त्यांना आजही बोलून दाखवला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणे विरुद्ध सामंत हा बाद पाहायला मिळेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निलेश राणेंचा रोख कोणाकडे?
नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातून मताधिक्य मिळाले नव्हते. राजापूर, रत्नागिरी आणि चिपळुण विधानसभेत राणे पिछाडीवर होते. या मतदार संघाची जबाबदारीही मंत्री उदय सामंत यांच्यावर होती असे निलेश राणे यांनी निकालानंतर सांगितले होते. त्यानंतर नुकताच नारायण राणे यांचा सत्कार रत्नागिरीत झाला. यावेळी बोलताना उदय सामंत यांचे नाव न घेता निलेश राणे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. रत्नागिरीत कोणालाही घाबरू नका. आपले दिवस आता सुरू झाले आहेत. कोणाचाही फोन आला तर दुसरा फोन हा राणेंचा असेल, असेही त्यांनी सांगितले. जिथे राणे आहेत तिथे तुम्ही घाबरू नका. ज्यांनी आपली वाट लावण्याचा प्रयत्न केला त्यांची वाट लावल्या शिवाय सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. चिपळूण पासून सुरूवात केली आहे. रत्नागिरी आणि राजापूरमध्ये सगळ्यांना साफ करणार असेही ते म्हणाले. त्यांचा रोख उदय सामंत यांच्याकडे होता अशी आता चर्चा रंगली आहे.
ट्रेंडिंग बातमी - मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, 'हा' आहे पर्यायी मार्ग
जैतापूरमुळे पराभव झाला
2014 साली जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पामुळे पराभव झाल्याचे निलेश राणे यावेळी म्हणाले. बारसू येथे माझा गाडी अडवायला सांगितली होती. मी आंदोलकां बरोबर चर्चा करायला तयार होतो. पण तसे झाले नाही. त्या मागे राजकारण होते असेही ते म्हणाले. दरम्यान नारायण राणे खासदार झाले म्हणजे मलाच खासदार झाल्या सारखे वाटत आहे असेही ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्याचे आपव्यावर उपकार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोकणसाठी व्हिजन काय? यासाठी विनायक राऊत त्यांच्याशी संघर्ष होता असेही ते यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - विधानपरिषदेला 12 वा उमेदवार देण्याची गरज नव्हती, विश्वजीत कदमांची रोखठोक भूमिका
रत्नागिरी मतदार संघावर दावा
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निलेश राणे यांनी रत्नागिरी विधानसभा मतदार संघावर दावा केला होता. हा मतदार संघ मुळचा भाजपचा असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे या मतदार संघातून भाजप निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे ते म्हणाले होते. त्यावर याबाबतचा निर्णय हे शिंदे आणि फडणवीस घेतील असे प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिले होते. सामंत हे या मतदार संघाचे सध्याचे आमदार आहेत. उदय सामंत यांनी लोकसभेला नारायण राणे यांचे काम केले नाही असा निलेश राणे यांचा आक्षेप आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी रत्नागिरी विधानसभेवर दावा केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world